टी-२० वर्ल्डकपमध्ये बुमराह खेळणार नसल्यानं टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा कोण सांभाळणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताकडे मोहम्मद शमी आणि दीपक चहारच्या रुपात दोन पर्याय आहेत. बीसीसीआय या दोघांपैकी एकाचा समावेश मुख्य संघात करू शकते. १५ ऑक्टोबरपर्यंत बीसीसीआयला हा बदल स्वत:च करता येईल. त्यानंतर त्यांना यासाठी आयसीसीच्या तांत्रिक गटाची परवानगी घ्यावी लागेल.
दीपक हुड्डादेखील दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या फिटनेसवरही टीम इंडिया लक्ष ठेऊन आहे. हुड्डाचा समावेश १५ सदस्यीय संघात आहे. पाठीच्या दुखण्यानं त्रस्त असलेला हुड्डा सध्या बंगळुरूच्या एनसीएमध्ये आहे. भारतीय संघ ६ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल. बुमराह नसल्यानं संघाच्या गोलंदाजीची धार कमी झाली आहे. ती उणीव भरून काढण्यासाठी फलंदाजीवर विशेष लक्ष केंद्रित केलं जात आहे. फलंदाजांनी चोख कामगिरी करून अधिक धावा करायच्या आणि गोलंदाजांवरील भार काहीसा हलका करायचा, अशी टीम इंडियाची रणनीती आहे.
बुमराहच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्यावरील जबाबदारी वाढेल. त्याला चार षटकांचा कोटा पूर्ण करावा लागू शकतो. हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, आर. अश्विन यांचा भारतीय संघात समावेश आहे. वेळ पडल्यास त्यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यास गोलंदाजांवरील दबाव कमी होईल.