मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चहूबाजूने राजकीय कोंडी झाली आहे. अनेक आमदार आणि खासदारांनी ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात सहभागी होणं पसंत केलं. एकनाथ शिंदे यांनी बंड करताना शिवसेना सोडली नसून थेट पक्षावरच दावा सांगितला आहे. त्यामुळे शिवसेना नक्की कोणाची ही लढाई थेट सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगासमोर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेली अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाकडून मोर्चेबांधणी सुरू असतानाच महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असेलली काँग्रेस मात्र उद्धव ठाकरेंच्या मदतीसाठी धावून आली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.

‘अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या यांच्या आकस्मित निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे,’ अशी घोषणा नाना पटोले यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे…कोणाची शिवसेना खरी, भाषण कोणाचं ऐकणार? पंकजा मुंडेंचं रोखठोक उत्तर

याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, ‘विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जातीयवादी धर्मांध भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाली होती. राज्यात अडीच वर्षे या महाविकास आघाडीचे सरकार होतं. या सरकारने शेतकरी कर्जमाफीसारखे अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. करोनासारख्या महाभयंकर संकटकाळात देशात सर्वोत्तम काम केले. पण सत्तापिपासू भारतीय जनता पक्षाने ईडी सीबीआय या केंद्रीय संस्थाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडले. महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न भाजपने केले, ते यशस्वी झाले नाहीत म्हणून त्यांनी शिवसेना पक्ष फोडला. भारतीय जनता पक्षाविरोधातील या लढाईत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून शिवसेना पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील,’ असं पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १४ ऑक्टोबरपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर ३ नोव्हेंबरला मतदान होईल आणि ६ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here