एकनाथ शिंदे कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार?
विधानसभेतील शिवसेनेच्या ५४पैकी ४० आमदार आणि लोकसभेतील १९पैकी १२ खासदारांचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी झालेल्या एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांना सर्वच स्तरावर आव्हान देत आता दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आपली राजकीय ताकद दाखवून देण्याची तयारी केली आहे. बीकेसी मैदानात होत असलेल्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचे भाषण हेच मुख्य आकर्षण असणार आहे. आपल्या पहिल्याच दसरा मेळाव्यातील भाषणात शिंदे काही धक्कादायक गोष्टी जाहीर करणार असल्याचे समजते.
१. वैयक्तिक अन्याय
शिवसेना नेतृत्वाकडून कशा प्रकारे आपले पंख छाटण्याचा प्रयत्न केला जात होता, याबाबत एकनाथ शिंदे यांनी बंडानंतर थेट विधानसभेतच माहिती दिली होती. २०१९ साली महाविकास आघाडीची स्थापना होत असताना मला मुख्यमंत्रिपद दिलं जाईल, असं सांगण्यात आलं होतं, मात्र नंतर अचानक ते स्वत:च त्या पदावर बसले, असा दावा त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत केला होता. तसंच माझ्याकडे देण्यात आलेल्या नगरविकास खात्यातही अनेक जण हस्तक्षेप करत होते, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. याबाबतच आज ते अधिक विस्ताराने बोलण्याची शक्यता आहे.
२. आर्थिक हितसंबंधांवर भाष्य
शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे समर्थकांकडून बंडखोरांवर पैसे घेतल्याचा आरोप करत ‘५० खोके, एकदम ओक्के’ अशा घोषणा देत डिवचण्यात आलं. त्यानंतर शिंदे गटाकडूनही पलटवार करत ‘मातोश्री’वर कोण-कोण खोके पुरवतात याची माहिती आमच्याकडे असल्याचं बोललं गेलं. या पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे हे ठाकरेंच्या आर्थिक हितसंबंधांवर गौप्यस्फोट करू शकतात.
३. आनंद दिघे आणि शिवसेनेतील घुसमट
शिवसेनेचे ठाणे जिल्ह्यातील दिवंगत नेते आनंद दिघे यांचा जीवनपट असलेल्या ‘धर्मवीर’ या सिनेमाने काही महिन्यांपासून राज्यातील राजकारण ढवळून काढलं. एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडानंतर दिघे यांचीही शिवसेनेत घुसमट करण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगत याबाबत आणखी काही गोष्टी भविष्यात उघड करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आजच्या दसरा मेळाव्यात ते दिघे यांच्याशी संबधित काही घटनांवर भाष्य करू शकतात.
शिंदे आज पुन्हा धक्का देणार?
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे ४० आमदार फुटले. याच जोरावर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचत शिंदे यांनी आपला गट हाच खरा आणि मूळ शिवसेना पक्ष असल्याचा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांना धक्के देण्याची तयारी ठेवली आहे. ठाकरे गटातील पदाधिकारी, माजी खासदार, आमदार आणि मुंबईतील काही माजी नगरसेवक यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश घडवून आणला जाण्याची शक्यता आहे.