विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बारामतीत एका कार्यक्रमात बोलताना दसरा मेळाव्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, आज सकाळपासून मला पत्रकार विचारत आहेत की मी कोणाचे भाषण ऐकणार?, उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकणार की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकणार. मी त्यांना म्हटले की कारे बाबा, मी दोघांचेही भाषण ऐकणार, तुला काही त्रास आहे का?.
अजित पवार पुढे म्हणाले की, मी दोघांचीही भाषणे ऐकतो. कारण मी दोघांसोबत काम केलेले आहे. एकजण मुख्यमंत्री होते आणि एकजण आमच्या मंत्रिमंडळात वरिष्ठ मंत्री म्हणून काम करत होते. शेवटी काय, आपण एकमेकांचे दुश्मन नाही आहोत. आपली विचारधारा वेगळी असू शकते, विरोधक वेगळे असू शकतात. परंतु आपली संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे यांचे काय मत आहे, त्यांचे काय मत आहे, हे काय बोलतायत, ते काय बोलतायत, विचार कसे मांडतायत. तसेच ज्यांना सभोवताली काय घडतंय हे पाहण्याची उत्सुकता असते ते सर्वजण दोघांचेही भाषण ऐकतीलच.
अजित पवारांचा मुख्यमंत्री शिंदे, उद्धव ठाकरेंना सल्ला
मात्र, असे असले तरी दोघांनीही बोलत असताना कमरेखाली वार होता कामा नये. खालच्या पातळीवर जाऊन टीकाटिप्पणी करता कामा नये. ही महाराष्ट्राची संस्कती नाही. ही शिवाजी महाराजांची शिकवण नाही. हा शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार नाही आहे. याचं भान आम्ही सगळ्याच राजकीय पक्षांच्या लोकांनी ठेवलं पाहिजे. आपणही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे, अशा प्रकारची विनंती मी करतो, असेही अजित पवार म्हणाले.