रत्नागिरी: राज्यातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याने जगातून करोना कायमचा जावा म्हणून चक्क गाऱ्हाणे घातलं आहे. ट्विटरवर तशी पोस्टच त्यांनी टाकली आहे.

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहून हे गाऱ्हाणे घातलं आहे. ‘बा देवा महाराजा… व्हाय महाराजा… ह्यो जो काय करोनाचो राक्षस जगात, देशात आणि माझ्या महाराष्ट्रात थैमान घालता हा त्येचो कायमचो काय तो बंदोबस्त कर रे महाराजा… पॉझिटिव्ह इले त्येंका निगेटिव्ह कर, निगेटिव्ह इले त्येंका सुखरूप ठेव रे महाराजा… माझ्या पोरांच्या परिक्षेचा तिडो लवकरात लवकर सुटू दि रे महाराजा… चाकरमान्यांका गणपतीचं दर्शन होऊ दि रे महाराजा… ह्योच्यात जर कोणी आडो इलो तर त्येका उभो कर, उभो इलो तर त्येका आडो कर रे महाराजा… एकाचे एकवीस कर… पाचाचे पंचवीस कर…पण माझ्या भारताक, महाराष्ट्राक लवकरात लवकर करोना मुक्त कर महाराजा… व्हय महाराजा…,’ असं गाऱ्हाणंच सामंत यांनी ईश्वराला घातले आहे.

दरम्यान, काल राज्यात दिवसभरात करोनाचे तब्बल ८१३९ रुग्ण वाढले असून त्याचवेळी राज्यात काल आणखी २२३ जणांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्यातील करोना बाधितांची संख्या अडीच लाखाच्या जवळ पोहचली आहे. काल रुग्णसंख्येत ८१३९ रुग्णांची भर पडल्याने एकूण आकडा २ लाख ४६ हजार ६०० इतकी झाला आहे. दुसरीकडे मृतांचा आकडा १० हजारपार गेला आहे. कालचा मृतांचा २२३ हा आकडा धरून आतापर्यंत करोना साथीत राज्यात १० हजार ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वच आकडे देशातील सर्वाधिक आकडे असून राज्याची चिंता वाढवणारे आहेत.

त्याशिवाय राज्यात काल ४३६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ३६ हजार ९८५ झाली आहे. काल करोनाच्या ८१३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९९ हजार २०२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख ८५ हजार ९९१ नमुन्यांपैकी २ लाख ४६ हजार ६०० नमुने पॉझिटिव्ह (१९.१७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८० हजार १७ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ३७६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

रत्नागिरी बातमी | Ratnagiri News | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here