यावेळी उद्धव ठाकरे यांनी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पूर्वीच्या काळी नरेंद्र मोदी, ‘पाकिस्तान को उसी की भाषा मे उत्तर देना चाहिए’, असे बोलायचे. मग चीनचे सैन्य भारतीय हद्दीत घुसखोरी करते तेव्हा तुमची ही भाषा कुठे जाते. तिकडे शेपट्या घालायच्या आणि इकडे पंजे काढायचे. आता तुम्ही गद्दारांच्या पालख्यांमध्ये बसून कशाला नाचताय? तुम्ही पाकव्याप्त काश्मीर भारता आणा आम्हीच तुम्ही तुम्हाला पूर्वीप्रमाणे डोक्यावर घेऊन नाचू, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
अमित शाहांचा दावा ठाकरेंनी पुन्हा फेटाळला
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपचा दावा पुन्हा एकदा फेटाळून लावला. मी शिवरायांच्या साक्षीने आणि माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो की, अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याचे ठरले होते. मात्र, त्यानंतर अमित शाह म्हणाले की, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणे शक्य नाही. मग आत्ता केलंत ते तेव्हाच का केलं नाहीत? पण तुम्हाला शिवसेना संपवायची होती, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले.
तुमच्या माथ्यावरी गद्दारीचा शिक्का आयुष्यभर पुसला जाणार नाही: उद्धव ठाकरे
शिवसेनेतील फुटीनंतर होत असलेल्या पहिल्याच दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत बंडखोरी केलेल्या आमदार आणि खासदारांवर घणाघाती टीका केली. शिवसेनेतून काही लोकांनी गद्दारी केली, होय गद्दारच म्हणणार. कारण आता त्यांच्या बुडाखाली जरी मंत्रिपदाच्या खुर्च्या चिकटल्या असतील तर त्या एक दिवस निघून जातील. मात्र कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला.