मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दसरा मेळावा बीकेसीत पार पडला. या मेळाव्यात संबोधित करताना शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी सरकार स्थापनेची आठवण सांगितली. यावेळी बिघडा बिघडी झाल्याचे सांगत शहाजीबापूंनी ठाकरेंवर निशाणा साधला. निवडणूक झाल्यावर भाजप-शिवसेनेचं सरकार बनवू असे या व्यासपीठावर असलेल्या सर्व आमदार आणि खासदारांनी जनतेला सांगितलं होतं. निवडणूक झाली. मतमोजणी झाली. दोन्ही पक्षाचे आमदार निवडून आल्यानंतर आम्ही मुंबईत आलो. मात्र, मुंबईत आल्यावर बिघडा बिघडी सुरू झाली, असे ते पुढे म्हणाले.
‘फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला’
यावेळी टीकेचा भडीमार करताना शहाजीबापूंनी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपल्याची टीका केली. ते म्हणाले आज गद्दारी केली. तेव्हा महाराष्ट्राने शाबासकी दिली असे म्हणायचं का? खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेला हे महाराष्ट्र विसरलेला नाही.
मी काँग्रेसमध्ये असतानाही बाळासाहेबांची सभा ऐकायचो. बाळासाहेब ठाकरे मैदाचं पोते कोणाला म्हणाले? बारामतीचा मंमद्या कुणाला म्हणाले? दाऊदचा हस्तक कुणाला म्हणाले? विलायती सोनिया गांधी मला चालणार नाही असे कोण म्हणाले?, असे एकावर एक सवाल उपस्थित करत त्यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या शैलीत घेरण्याचा प्रयत्न केला.
उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवताना ते पुढे म्हणाले की, अडीच वर्षापूर्वी तुम्ही युतीचे तुकडे केले. आज तुम्ही एक घाव दोन तुकडे म्हणता. आता कशाचे तुकडे करता? तुम्ही आमदारांना फरफटत नेले आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या उकिरड्यावरच फेकून दिले. ते पाप उद्धव ठाकरे तुम्ही केले. मात्र मुक्यमंत्री एकनाथ शिंदे यानीं ते पाप धुतले.
आम्ही गद्दार नाही
शहाजीबापू पुढे म्हणाले, आम्हा गद्दार म्हटले जाते. पण आम्ही गद्दारी नाही. त्यांनी ज्या चुका केल्या त्या चुका दुरुस्त करण्यासाठी हे उचलेले पाऊल आहे. आमच्या नेत्यांनी अनेक मेळावे घेतले आहेत. लाख-लाख लोक मेळाव्याला येतात. हे काय आहे?