म.टा. प्रतिनिधी, नगर: नगर महापालिकेच्या हद्दीत करोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे आता वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महापालिकेच्या पथकाने आज नगर शहरातील लक्ष्मीकारंजा परिसर, व सावेडी उपनगरात पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. नगर जिल्ह्यामध्ये काल एकाच दिवशी तब्बल ९० करोना बाधीत वाढले आहेत. यामधील नगर शहरातील बाधितांची संख्या तब्बल ६२ एवढे आहे.

करोनाने आता नगर शहरासह सावेडी उपनगर ही व्यापण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता सावेडी उपनगरातही ज्या भागात रुग्ण जास्त आहेत, अशा भागात कंटेन्मेंट झोन करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.
नगरमध्ये सध्या सिद्धार्थनगर, तोफखाना, आडतेबाजार, पद्मानगर, बागरोजा हडको व नंदनवन कॉलनी (बुरुडगाव रोड) हे सहा कंटेन्मेंट झोन आहेत. याशिवाय काल रात्री सावेडीतील भिस्तबाग नाका येथे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे या भागात व नगर शहरातील लक्ष्मीकारंजा परिसरात महापालिकेच्या पथकाने आज पाहणी केली आहे. शहर अभियंता सुरेश इथापे यांनी ही माहिती दिली. हे दोन भाग देखील कंटेन्मेंट झोन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत असलेल्या पाच कंटेन्मेंट झोन मुळे निम्म्यापेक्षा अधिक नगर लॉकडाऊन झाले आहे. त्यातच आणखी कंटेन्मेंट झोन वाढत असल्यामुळे नगरकरांसह व्यापाऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे.

तर, नगर बंद करण्याचा पर्यायः आयुक्त मायकलवर

‘नगर शहरामध्ये सध्याच्या परिस्थितीत सहा कंटेन्मेंट झोन आहेत. याशिवाय आज लक्ष्मीकारंजा व सावेडीतील भिस्तबाग चौक परिसरात महापालिकेच्या पथकांना पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या भागात रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे तेथेही कंटेन्मेंट झोन करण्याबाबत विचार सुरू आहे. तसेच शहराच्या सर्वच भागात सध्या पेशंट वाढू लागले आहेत. पेशंट वाढीचा हा ट्रेंड असाच कायम राहिल्यास, येत्या दोन दिवसात संपूर्ण नगरच लॉकडाऊन करण्याबाबत निर्णय घ्यायचा का , याबाबतही आम्ही पर्याय समोर ठेवला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here