म.टा.प्रतिनिधी, नगर: ‘आरोप-प्रत्यारोप करणे सोपे आहे. पण किमान डॉक्टर नसलेल्या माणसाने कुठल्याही आरोग्य विषयक यंत्रणेवर टिकाटिपण्णी करू नये. आज पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री सर्वच काम करीत आहेत. आम्ही सर्वच जण काम करीत आहोत. पण माझी सर्वच राजकीय लोकांना विनंती आहे की त्यांनी डॉक्टर व डॉक्टरांचे इक्यूमेंटवर टिकाटिपण्णी करू नये,’ असा सल्लाच खासदार डॉ.सुजय विखे यांनी आज दिला.

‘देशाचे यांचे मला आभार मानायचे आहेत. कारण जर पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते, तर आज देशाची करोनाची परिस्थिती फारच विपरित असती. पण मी अतिशय जबाबदारीने बोलतो कालच पीएम केअर फंडातून २७ व्हेंटिलेटर नगरच्या जिल्हा रुग्णालयातील आयसीयूला देण्यात आले आहेत. हे शेवटी एक योगदान आहे,’ असेही ते म्हणाले. ‘आता हे व्हेंटिलेटर चालत नाही, असे कोणीतरी म्हटलयं. पण जोपर्यंत त्या गोष्टीचा वापर करीत नाही, तोपर्यंत ते चालतयं का नाही, हे कळत सुद्धा नाही,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

वाचाः

नगर जिल्ह्यात करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता नोबल मेडिकल फाउंडेशनतर्फे नगर जिल्हा रुग्णालयामध्ये २० खाटांचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. या विभागाचे उद्घाटन आज आरोग्यमंत्री राजेश टोपे व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाले. या कार्यक्रमात खासदार विखे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार आदी उपस्थित होते.

‘प्रत्येक परिसरात जे हेल्थ वर्कर राहत आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे हेल्थ वर्करच्या सुरक्षेबाबत केवळ कागदावरच काही नको. तर हेल्थ वर्कर राहत असलेल्या भागामध्ये त्यांना कोणतीही अरेरावी होऊ देऊ नका. तेथील नागरिकांनीही तसा मनाचा मोठेपणा दाखवावा. जर कोणत्या हेल्थ वर्कर बरोबर कोणी अरेरावी केली, तर ताबडतोब संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. नगर जिल्ह्यासाठी पुढच्या आठवड्यात बारा रुग्णवाहिका या खासदार निधीतून मी जिल्हाधिकारी यांच्याकडे देणार आहे. ज्या रुग्णवाहिका कोविड साठी वापरल्या जातील. तसेच नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करोनाचे संक्रमण वाढल्यामुळे करोना टेस्ट रिपोर्ट पेडींग राहण्याचे प्रमाण वाढले आहे. रिपोर्ट येण्यास ४८ तास लागत आहेत. पण रिपोर्ट पेडिंग न राहाता ८ तासात ते यावेत. यासाठी आम्ही आमच्या विळदघाट येथील लॅबमध्ये सरकारी दरापेक्षा तीस टक्के कमी दराने करोना चाचणी करून देऊ,’ अशी घोषणाही विखे यांनी केली.

प्रशासनाचे केले कौतुक
‘जिल्ह्यात करोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. पण जे काम प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह सर्वांनी केले आहे, ते पाहता प्रशासन हे कुठ कमी पडत नाही,’ असे सांगतानाच खासदार विखे यांनी प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले. ‘नगर जिल्ह्यातील व नगर शङरातील खासगी डॉक्टरांनी जे प्रशासनाला सहकार्य केले, ते राज्यात कुठेच मिळाले नसेल,’ असा दावाही त्यांनी केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here