सरकारी योजनांवरील व्याजदरात वाढ
गेल्या आठवड्यात सरकारने काही लहान बचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली होती. सरकारने तिसऱ्या तिमाहीसाठी काही लहान बचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. दोन वर्षांच्या टाइम डिपॉझिटवर (TD) व्याजदर ०.२- टक्क्यांनी वाढला आहे. त्याचवेळी, तीन वर्षांच्या मुदत ठेवीवर ०.३० टक्के वाढ झाली आहे. याशिवाय सध्याच्या सणासुदीत ज्येष्ठ नागरिकांनाही शासनाकडून भेटवस्तू देण्यात आली आहे. सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) वरील व्याजदर ७.६ टक्केपर्यंत वाढवला आहे. याशिवाय मासिक उत्पन्न खाते योजना आणि किसान विकास पत्र (KVP) वरही व्याजदर वाढवण्यात आले आहेत.
सरकारने योजनांवर व्याज वाढवले
सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी दोन वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर ५.५ टक्क्यांवरून ५.७ टक्के केला आहे. तर ३ वर्षांच्या मुदत ठेवीवरील व्याजदर ५.५ टक्क्यांवरून ५.८ टक्के करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर आता ७.४ वरून ७.६ टक्के पर्यंत वाढवला. त्याचबरोबर मासिक उत्पन्न खाते योजनेवरील व्याजदर ६.६ टक्क्यांवरून ६.७ टक्के झाला आहे. याशिवाय किसान विकास पत्रावरील व्याजदर ६.९ वरून ७.० टक्के झाला आहे.
पोस्ट ऑफिस स्कीम म्हणून प्रसिद्ध
लहान बचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (NSC) यासह विविध योजनांचा समावेश होतो. या योजनांना पोस्ट ऑफिस स्कीम्स असेही म्हणतात. अल्पबचत योजनांवरील व्याजाचे सरकार दर तीन महिन्यांनी पुनरावलोकन करते. यादरम्यान व्याजदर वाढवायचे, कमी करायचे की स्थिर ठेवायचे याचा निर्णय घेतला जातो.