अल्ताफ शेख वर्षभरापूर्वी आयसीआयसीआय बँकेत कस्टोडियन म्हणून कामाला लागला. बँकेच्या लॉकरच्या चाव्या सांभाळण्याचं काम त्याच्याकडे होतं. वर्षभर काम करत असताना त्यानं चोरीची योजना आखली. संपूर्ण यंत्रणेत असलेल्या त्रुटी त्यानं हेरल्या. त्यांचा वापर त्यानं चोरीसाठी केला. चोरी यशस्वी करण्यासाठी शेखनं एसीची डक्ट स्पेस वाढवली. त्यातून रोकड बाहेर टाकता येईल याची खातरजमा केली. सीसीटीव्ही फुटेजसोबत छेडछाड करून चोरीचा पुरावा नष्ट केला.
अलार्म बंद करून सीसीटीव्हीशी छेडछाड केल्यावर शेखनं बँकेची तिजोरी उघडली. त्यानं रोकड डक्टमध्ये टाकली. तिथून ती कचरा टाकण्यासाठी असलेल्या पाईपमध्ये सरकवली. पैसे गायब झाल्याचं लक्षात आल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांना चोरीबद्दल समजलं. सीसीटीव्हीचा डीव्हीआरही गायब असल्यानं प्रकरणाचं गांभीर्य वाढलं.
शेख पैसे घेऊन फरार झाला. आपली ओळख समोर येऊ नये म्हणून त्यानं लूक बदलला. ओळख लपवण्यासाठी बुरखा वापरू लागला. शेखची बहिण निलोफरला या चोरीची कल्पना होती. तिच्या घरात काही रोकड लपवण्यात आली. या प्रकरणात ती सहआरोपी असून तिला अचक करण्यात आली आहे. शेखला अडीच महिन्यांनंतर पुण्यातून अटक करण्यात आली.