संयुक्त अरब अमिरातमध्ये असलेल्या दुबईत हिंदू मंदिराचं उद्घाटन झालं आहे. कॉरिडॉर ऑफ टॉलरन्समध्ये या मंदिराची उभारणी करण्यात आली. ७० हजार चौरस फूट परिसरावर भव्यदिव्य मंदिर बांधण्यात आलं आहे. मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला २०० हून अधिक जण उपस्थित होते.

यूएईचे मंत्री शेख नाहयान मुबारक अल नाहयान, यूएईमधील भारतीय राजदूत संजय सुधीर, सोशल रेग्युलेटरी अँड लायन्सिंग एजन्सी फॉर कम्युनिटी डेव्हलपमेंट अथॉरिटीचे सीईओ डॉ. उमर अल मुथन्ना, दुबई हिंदू मंदिरचे ट्रस्टी राजू श्रॉफ उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. विशेष म्हणजे या मंदिराच्या परिसरात चर्च, गुरुद्वाऱ्यासह अनेक धर्मस्थळं आहेत.
या मुस्लिम देशात उभारले भव्य हिंदू मंदिर, दसऱ्याला भगवान शिव आणि कृष्णासह गुरु ग्रंथसाहिबची पूजा
दुबईत नव्या हिंदू मंदिराचं उद्घाटन होणं भारतीयांसाठी आनंदाचा क्षण असल्याची भावना राजदूत संजय सुधीर यांनी व्यक्त केलं. यूएईमधील हिंदूंची संख्या मोठी आहे. त्यांच्या धार्मिक आकांक्षा यामुळे पूर्ण होतील. नवं मंदिर गुरुद्वाऱ्याच्या शेजारी आहे. या गुरुद्वाऱ्याचं उद्घाटन २०१२ मध्ये झालं होतं.

दुबईतलं नवं हिंदू मंदिर सर्वच धर्मांसाठी अध्यात्मिक केंद्र आहे. मंदिरात हिंदू धर्माच्या १६ देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिरात एक ज्ञान कक्ष असून धार्मिक कार्यक्रमांसाठी एक सामुदायिक केंद्रदेखील आहे. मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार, नवं मंदिर सकाळी ६.३० वाजता उघडेल. रात्री ८ वाजेपर्यंत ते भक्तांसाठी खुलं राहील. या मंदिराला दिवसभरात १००० ते १२०० भाविक भेट देतील असा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here