मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर काल मुंबईत झालेल्या दोन दसरा मेळाव्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर केलेल्या टीकेला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर देत उद्धव यांच्यावर जोरदार टीका केली. बाप चोरल्याचं वक्तव्य करत उद्धव ठाकरेंनी संस्कार दाखवून दिल्याची टीका राणांनी केली आहे. तसंच उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांची प्रॉपर्टी घेऊ शकतात पण विचारधारा नाही, असाही टोला नवनीत राणा यांनी लगावला. राणा यांनी केलेल्या या टीकेबद्दल आज शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र राणांबाबत विचारलेल्या प्रश्नांनंतर हात जोडत त्यांना उत्तर देण्याचं पेडणेकर यांनी टाळलं आहे.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदी असताना नवनीत राणा यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून लक्ष्य करत ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे राणा विरुद्ध शिवसेना असा संघर्ष रंगला होता. मात्र आता नवनीत राणांकडून होत असलेल्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याच्या रणनीतीचा अवलंब शिवसेनेनं केला आहे का, अशी चर्चा किशोरी पेडणेकर यांच्या कृतीनंतर सुरू झाली आहे. उद्धवजी, तुम्हीही पुढच्या काळात आजोबा व्हाल, तुमच्या नातवाबद्दल तसं… श्रीकांत शिंदेंचं भावनिक पत्र
किशोरी पेडणेकर यांनी नवनीत राणा यांना उत्तर देणं टाळलं असलं शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शिंदे गटावर मात्र जोरदार निशाणा साधला आहे. जे जातात त्यांच्यामुळे कोणताच पक्ष संपत नाही, हे कालच्या दसरा मेळाव्याने दाखवून दिलं, असं त्यांनी म्हटलं आहे.
‘बीकेसीतील मैदानात भाषण सुरू झाल्यावर अनेक लोक उठून जात होते. मात्र उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सर्वजण चांगला प्रतिसाद देत होते. आम्ही स्वत:च्या पैशाने प्रवास करून आणि घरून भाकरी आणत उद्धवजींचे विचार ऐकायला आलोय असं अनेकांनी शिवाजी पार्कमध्ये सांगितलं. स्वतःहून सभेसाठी येणं आणि माणसं आणणं यात फरक आहे,’ असा टोला किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवर जे काही भाषण केलं त्याची स्क्रिप्ट भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच आल्याचा आरोपही किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. ‘आम्ही शिंदे साहेबांना चांगलं ओळखतो, हे शिंदे साहेबांचे भाषण नाही, ते भाजपनेच लिहून दिलेलं भाषण होतं,’ असं पेडणेकर म्हणाल्या.