ठाणे : शिवसेनेत बंडखोरी करून भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि मनसे नेत्यांची जवळीक वाढली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. तसंच मनसे नेत्यांकडून नव्या सरकारवर थेट टीका करणंही टाळलं जात होतं. मात्र आता एका मुद्द्यावरून ठाणे जिल्ह्यातील मनसे नेते आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. ठाण्यातील कळवा परिसरातील एका मंडळाने मुख्यमंत्री आले नाहीत म्हणून देवीच्या मूर्तीचे विसर्जन केलं नाही. यावर संताप व्यक्त करत जर देवीच्या मूर्तीचं विसर्जन वेळेत केलं नाही तर मनसे कार्यकर्ते तिथे पोहचून देवीचं विसर्जन करतील, असा इशारा मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. तसंच जर मुख्यमंत्र्यांना एवढा वेळ असेल तर कळव्याला जाताना मुख्यमंत्र्यांनी कळवा पुलाचे उद्घाटन देखील करावं, असा टोलाही अविनाश जाधव यांनी लगावला आहे.

ठाण्यातील कळवा सूर्यनगर येथील नवदुर्गा चॅरिटेबल त्रस्त या मंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मंडळाच्या देवीच्या दर्शनासाठी आले नाहीत म्हणून देवीचे विसर्जन केलं नाही. यावर मनसेकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. हा हिंदू धर्माचा अपमान आहे. देवापेक्षा मुख्यमंत्री मोठे झाले का? मुख्यमंत्री हिंदू, हिंदुत्व म्हणतात ते खोटं आहे का? असा सवाल उपस्थित करत देवाचा खेळ करू नका. देव हे आमच्या श्रद्धेसाठी आहेत, त्यांचा उपयोग तुमच्या राजकरणासाठी करू नका. हिंदू धर्माचा अपमान करू नका. जर वेळेत देवीच्या मूर्तीचे विसर्जन झाले नाही तर मनसे पदाधिकारी स्वतः तिथे जाऊन देवीचे विसर्जन करतील, असा इशारा अविनाश जाधव यांनी केला आहे.

२५ वारकऱ्यांना घेऊन आळंदीला जाणारी पिकअप उलटली, पुण्यात मोठा अपघात

‘मुख्यमंत्र्यांमुळेच कळवा पुलाचे उद्घाटन थांबलं’

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळव्यात जायला एवढा वेळ असेल तर कळवा पूल हा बऱ्याच दिवसांपासून तयार आहे. त्यामुळे या देवीच्या दर्शनाला जाता-जाता मुख्यमंत्र्यांनी या कळवा पुलाचं देखील उद्घाटन करून जावं. कारण मुख्यमंत्र्यांमुळेच त्या पुलाचे उद्घाटन थांबलं आहे. कळवा विटावाकर गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतूक कोंडीमुळे ताटकळत आहेत. त्या कळवा पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करावं. एकाच वेळी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही काम करावी,’ असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here