‘त्या वक्तव्याबद्दल इंदोरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केल्याने हा विषय तेथेच संपवायला हवा होता. मात्र, काही मंडळी या विषयाला हवा देत आहेत. महाराजांनी वारकरी संप्रदायाची पताका खेडोपाडी पोहचविली. समाजप्रबोधनाचे त्यांचे काम सातत्याने सुरू आहे. मुख्य म्हणजे ग्रंथाच्या आधारेच त्यांनी व्यक्तव्य केले होते. तरीही दिलगिरी व्यक्त केल्याने विषय संपायला हवा होता. मात्र काही मुठभर लोकांनी कायद्याची पळवाट शोधत गुन्हा दाखल केला. कायद्याच्या नावाखाली पुरोगामी मंडळी भारतीय संस्कृतीवर घाला घालत आहेत. त्यांना पाठबळ देण्याचे काम काही मंडळी करत आहेत. असे असले तरी राज्यातील अध्यात्मिक संप्रदायतील मंडळी इंदोरीकरांच्या पाठीशी आहेत.’ असं भोसले म्हणाले.
लॉकडाउनच्या मुद्द्यावर भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘लॉकडाउन शिथील करीत दारुच्या दुकानांसह अनेक व्यवसाय सुरू केले, मात्र मंदिरे अद्याप बंदच आहेत. खरे तर मंदिरे उघडण्याचे निर्देश केंद्र सरकारने यापूर्वीच दिले आहेत. अनेक राज्यांत मंदिरे खुली झाली. महाराष्ट्रात मात्र ती अद्याप कुलूप बंद आहेत. शिवसेना पूर्वी प्रखर हिंदुत्ववादी होती. गेल्या सहा महिन्यांत मात्र शिवसेना पूर्ण बदलली असून मुख्यमंत्री ठाकरे शरद पवारांशिवाय कोणालाही भेटत नाहीत.’
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मनसेचे नेते अभिजित पानसे यांनीही इंदोरीकरांची भेट घेतली होती. त्यांनीही इंदोरीकर यांची बाजू उचलून धरली होती.
इंदोरीकर यांच्याविरूद्ध संगमनेरच्या कोर्टात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांना समन्स पाठविण्यात आले असून सात ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. इंदोरीकर यांच्याविरूद्ध भक्कम पुरावे असून त्यांना या गुन्ह्यात नक्कीच शिक्षा होईल, असे मागील तारखेच्यावेळी सरकारी वकिलांना सांगितले होते. त्यानंतर आता विरोधीपक्षाच्या नेत्यांनी इंदोरीकरांची भेट घेण्यास सुरवात केली आहे. मुख्य म्हणजे गुन्हा दाखल होण्यापूर्वी विरोधी पक्षांसह सर्वच पक्षांच्या लोकांनी, सरकारमधील मंत्र्यांनी इंदोरीकरांची बाजू उचलून धरण्याचा प्रयत्न केला होता. आता विरोधकांनी उघडपणे इंदोरकरांच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरविले असल्याचे दिसून येत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times