लोणावळा : मावळ तालुक्यात पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडला असून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्याच चुलत भावाने दारूच्या नशेत बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी संबंधित नराधमाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर नराधम हा मूळचा नेपाळमधील अझाम येथील असून, तो सध्या लोणावळ्या जवळील वरसोली येथे वास्तव्यास आहे.

शंकर पानसिंग बहाद्दूर थापा (वय- २४, सध्या रा. वरसोली, मावळ, मूळ रा. चौरपाटी, अझाम, नेपाळ ) असं अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या नराधम आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

मोबाईल चार्जरने घेतले पाच बळी, वांद्रे-वरळी सी लिंकवरील भीषण अपघाताची नवी माहिती

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी हे मूळ एकाच गावचे रहिवासी असून, ते सध्या वरसोली येथे एकाच ठिकाणी राहतात. तसेच नात्याने ते एकमेकांचे चुलत बहीण-भाऊ आहेत. आरोपी शंकर याने पीडित मुलगी आणि तिच्या ७ वर्षीय लहान भावाला भाजीपाला आणण्यासाठी जाऊ असे सांगत, त्यांना सुरेश मोतीलाल तालेरा यांच्या पडिक जागेत नेले. त्या ठिकाणी शंकर याने पीडित मुलीला दारु पाजून तिच्यावर दारुच्या नशेत बलात्कार केला.

हा धक्कादायक प्रकार मंगळवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेची माहिती मुलीच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी संबंधित नराधमाला अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले असता वडगाव सत्र न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे या करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here