Drone News : कला शाखेत शिकणाऱ्या वर्धा (Wardha) जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यानं कमाल केली आहे. या विद्यार्थ्यानं शेतीच्या फवारणीसाठी ड्रोन (Drone) बनवला आहे. राम कावळे असं कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचा हा विद्यार्थी आहे. विशेष म्हणजे या ड्रोनद्वारे फक्त 10 मिनिटात एक एकरावर फवारणी करण्याची क्षमता आहे. त्यामुळं राम कावळेच्या हुशारीची सर्वत्रच चर्चा सुरु आहे.

 स्वस्त ड्रोन बनवण्याचा मानस

शेतातील पिकांवर औषध फवारणीचं काम तसं जोखमीचं आणि त्रासदायकच आहे. आता शेती कामासाठी मजूर मिळत नसल्यानं आणखीनच अडचणी वाढल्या आहेत. त्यात एकीकडं नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असलं तरी आर्थिक परिस्थितीमुळं शेतकऱ्यांना महागडी उपकरणं विकत घेणं शक्य होत नाही. अशात वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या राम कावळे या कला शाखेत द्वितीय वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यानं कमाल केली आहे. शेतातील पिकावर फवारणीसाठी उपयोगी ठरणारा ड्रोन बनवला आहे. त्याच्या या कामगिरीची सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होमार आहे. संशोधन करत आणखी स्वस्त ड्रोन बनवण्याचा त्याचा मानस आहे.  

स्वतःच अभ्यास करुन बनवला ड्रोन

रामने समुद्रपुरच्या विद्याविकास कनिष्ठ महाविद्यालयात ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीचा व्यावसायिक कोर्स केला. यातून त्याला टेक्नॉलॉजीच ज्ञान मिळालं. याच ज्ञानाचा उपयोग करून त्यान महाविद्यालयात बीएचं शिक्षण घेताना चक्क ड्रोन बनवला. लग्न समारंभात वापरल्या जाणारे ड्रोन पाहून त्यानं स्वतःही ड्रोन तयार करण्याचा संकल्प केला. घरी टेक्नॉलॉजीचा फारसा कुणाला गंध नसताना त्यानं स्वतःच अभ्यास करुन शेतात फवारणीस उपयोगी ठरणारा ड्रोन बनवला आहे. 

दहा लीटर क्षमतेची टाकी

सर्वसाधारण कुटुंबातील राम कावळे याने आजोबाच्या आणि नातेवाईकाच्या मदतीनं सुटे भाग एकत्र करत हा ड्रोन तयार केला आहे. त्याला दहा लीटर क्षमतेची टाकी असून शेताच्या चारही बाजूंची कमांड दिल्यावर हा ड्रोन अवघ्या पंधरा ते विस मिनिटात एक एकर फवारणी करतो असं सांगितले जाते. हा ड्रोन तयार करण्यास जवळपास चार लाख रुपये खर्च आला आहे. सुटेभाग लवकर उपलब्ध झाल्यास लवकर ड्रोन तयार करू शकतो अशी माहिती रामने दिली. या ड्रोनची किंमत कमी असल्याचेही त्याने सांगितले. आणखी कमीत कमी किंमतीत ड्रोन तयार करण्याचे संशोधन करत असल्याचे रामने सांगितले. 

शेतीच काम कष्टाचं असतं. सध्या शेती क्षेत्रात विविध संशोधन होत आहे. कृषी क्षेत्रामध्ये स्वयंचलित ड्रोनचाही उपयोगाची गरज आहे. त्यात राम कावळे या विद्यार्थ्याने ड्रोन तयार करत त्यात अधिक संशोधन करण्याची तयारी केली आहे. सरकारनं अनुदान दिल्यास आणि संशोधनास वाव दिल्यास निश्चित शेतकऱ्यांना कमी किंमतीत ड्रोन उपलब्ध होण्यास मदत होईल.

 

महत्त्वाच्या बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here