मेडन फार्म्यास्युटिकल्सनं तयार केलेल्या ४ कफ सिरपमध्ये डायथायलिन ग्लाइकॉल (diethylene glycol) आणि एथिलीन ग्लायकॉल (ethylene glycol) यांचं प्रमाण अधिक आढळून आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात चारही कफ सिरप केवळ गाम्बियातच आढळून आली आहे. मात्र हे सिरप इतर देशांच्या बाजारांमध्येही उपलब्ध असू शकतात. त्यामुळे त्यांचा वापर तातडीनं रोखण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं दिल्या आहेत.
मेडन फार्म्यास्युटिकल्स कंपनी हरयाणाची आहे. तिनं कॉर्पोरेट कार्यालय दिल्लीत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं अलर्ट जारी केल्यानंतर कंपनीची चौकशी सुरू झाली आहे. कंपनीनं तयार केलेल्या सिरपचा वापर केल्यानं गाम्बियामध्ये ६६ मुलांचा मृत्यू झाला. या मुलांचं वय ५ वर्षांपेक्षा कमी होतं. कफ सिरप घेतल्यानंतरच्या ३ ते ५ दिवसांत ही मुलं आजारी पडली. त्यानंतर त्यांना मृत्यूनं गाठलं.
गाम्बियातील मुलांच्या मृत्यूची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं २९ सप्टेंबरला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला दिली होती. मेडन कंपनीच्या ४ सिरपमध्ये डायथायलीन ग्लायकॉल आणि एथिलीन ग्लायकॉलचं प्रमाण जास्त असल्याचं तपासणीत आढळून आलं. या दोन्ही घटकांचं अधिक प्रमाण आरोग्यासाठी धोकादायक आहे. कारण त्यामुळे अनेक साईड इफेक्ट्स होतात. डायथायलीन ग्लायकॉल आणि एथिलीन ग्लायकॉलच्या अधिकच्या मात्रेमुळे किडनीची समस्या, पोटदुखी, उल्टी, अतिसार, डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.