Madha Rain News : राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊस (Rain) कोसळत आहे. काही ठिकाणी या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच या पावसाचा शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. दरम्यान, सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यातील ढवळस (Dhavalas) परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत असून, अनेक ठिकाणची वाहतुक बंद करण्यात आली आहे. तसेच या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच करमाळा तालुक्यातही जोरदार पाऊस झाला आहे. 

ढवळस-निमगाव रस्त्यावरील वाहतूक बंद

माढा तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. ढवळस गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. यामुळं रस्त्यांना नदीचे स्वरुप आलं आहे. ढवळस परिसरात सलग सहा तास जोरदार पाऊस झाला आहे. या जोरदार पावसामुळं निमगाव ढवळस रोडवरील पूल वाहून गेला आहे. रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे. सर्वत्र पाणी झाल्यानं रस्ते बंद झाले आहेत. ढवळस-निमगाव रस्त्यावरील वाहतूक बंद झाली असून बेंद ओढा दुथडी भरुन वाहत आहे. पुलावरुन पाणी वाहत असल्यानं या संपूर्ण परिसराची वाहतूक बंद झाली आहे. ढवळससह पिंपरी, जाखले, भोगेवाडी या परिसरात अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. ताली, बांध फुटले आहेत. ढवळस येथील रेल्वे गेट नं 35 इथे रेल्वे प्रशासनाने नवीन गेट खालून बोगदा करुन रस्ता केला पण या रस्त्यावर सध्या पाच ते सहा फूट पाणी आहे.

करमाळा तालुक्यातही जोरदार पाऊस

करमाळा तालुक्यातील केमसह आजूबाजूच्या पाथुर्डी, मलवडी, आदी गावात अतिवृष्टी झाली आहे. केम गावाचा दहा ते पंधरा गावाशी संपर्क तुटला आहे. त्यामुळं केम गावातील जिल्हा परिषद शाळेसह हायस्कूल आणि कॉलेजला  सुट्टी जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. किराणा दुकानातील किराणा माल, कृषी दुकानातील खत, शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेली आहेत. केम येथील रेल्वेचा उड्डाणपूलाचे काम करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून, केम पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. दरम्यान, तातडीनं पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रहार संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here