नागपूरः ‘ताई, आई-बाबा चांगले आहेत, आई-बाबांचा सांभाळ कर’,अशा आशयाचा व्हॉट्सअॅप मॅसेज पाठवून २२ वर्षीय युवकाने गळफास घेतला. ही ह्दयद्रावक घटना रविवारी स्नेहनगर येथे उघडकीस आली. सिद्धेश नरेंद्र भागडे, असं मृताचं नाव आहे. तो पुण्यातील कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता.

लॉकडाऊनमुळे तो नागपुरात परतला. शनिवारी रात्री त्याने बहिणीच्या व्हॉट्सअॅपवर मॅसेज केला. आई-बाबांचा सांभाळ कर, असे त्याने मॅसेजमध्ये लिहिले. त्यानंतर पहाटे ५ वाजताच्या सुमारास पंख्याला ओढणी बांधून सिद्धेश याने गळफास घेतला. सकाळी त्याच्या बहिणीने मॅसेज बघितला. काय करतो आहेस, असा मॅसेज तिने केला. त्याने उत्तर दिले नाही. तिला संशय आला. तिने सिद्धेश याला आवाज दिला. प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा उघडून बघितले असता सिद्धेशने गळफास लावलेला दिसला.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवचरण पेठे यांच्यासह प्रतापनगर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी सिद्धेशचा मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. सिद्धेश याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. सिद्धेश याचे वडील गडचिरोलीतील बँकेत कार्यरत असल्याची माहिती आहे. प्रतापनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here