राजस्थानमधील विधिमंडळ पक्षाची बैठक सोमवारी बोलावण्यात आली आहे. ही बैठक मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी होणार आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. पण या बैठकीला आपण जाणार नाहीए. तसंच आपल्याला ३० आमदारांचा पाठिंबा आहे. यामुळे राजस्थानमधील गहलोत सरकार अल्पमतात आल्याचा दावाही, सचिन पायलट यांनी केला आहे. यासंदर्भात पायलट यांनी पत्रक जारी करून अधिकृतरित्या ही माहिती दिली.
सचिन पायलट यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आपले जुने मित्र ज्योतिरादित्य शिंदे यांची दिल्ली भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास ३० मिनिटं चर्चा झाली. या चर्चेनंतर सचिन पायलट यांनी पत्रक जारी करून अधिकृतपणे ही माहिती दिली. ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशात बंड केल्याने काँग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार पडले. तिथे भाजपची पुन्हा सत्ता येऊन शिवराज सिंह चौहान हे मुख्यमंत्री झाले. आता राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडाला भाजपकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
सोमवारच्या बैठकीसाठी सचिन पायलट यांना आमंत्रण करण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, असं मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे. तर भाजपला रोखण्यासाठी सोमवारच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपने मध्य प्रदेश आणि मणिपूरमध्ये सत्तांतर घडवलं. त्याची पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे. सोमवारच्या बैठकीत पक्षाचे सर्व आमदार उपस्थित राहतील, याबाबत चाचपणी करण्यात येणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं.
सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर अशोक गहलोत यांनी रविवारी रात्री ९ वाजता जयपूरमध्ये पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सचिन पायलट यांच्यासोबत दिल्लीला गेलेले तीन आमदारही उपस्थित होते. आपण काँग्रेसमध्येच राहणार. गहलोत सरकार कायम राहील, असं या आमदारांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times