निमंत्रण देऊन देखील देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री आले नाही म्हणून ठाण्यातील कळवा विटावा येथील सूर्यनगर परिसरातील नवदुर्गा चॅरिटेबल ट्रस्ट मंडळाने देवीचे विसर्जन थांबवून ठेवले होते. मुख्यमंत्री जोपर्यंत दर्शनासाठी येत नाही तोपर्यंत या देवीचे विसर्जन करणार नसल्याचा अट्टाहास या मंडळाकडून करण्यात आला होता. मात्र, देवीचे विसर्जन थांबवणे ही देवीची विटंबना असून वेळेत विसर्जन झाले नाही तर आम्ही स्वतः जाऊन देवीचं विसर्जन करु असा इशारा ठाणे पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला होता.
प्रसार माध्यमांमध्ये या देवीचं विसर्जन थांबवल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी या मंडळाची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी देवीचे दर्शन घेतले आणि मंडळातील भाविकांची समजूत काढली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचा गाडा आखण्यात व्यस्त असून त्यांच्याकडे सर्व ठिकाणी पोहचणे शक्य नसल्याने आम्हाला या ठिकाणी पाठवले असल्याचं आश्वासन दिल्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री वाजत गाजत आणि ढोल ताशाच्या तालावर नाचून या देवीचे विसर्जन केले.
या नवदुर्गा चॅरिटेबल ट्रस्ट मंडळाचे अध्यक्ष तानाजी कोळेकर हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत. त्यामुळे आपल्या मंडळाच्या देवीचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उपस्थित राहावं यासाठी मंडळाकडून मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, राज्याचा गाडा आखण्यात आणि दसरा मेळाव्याच्या तयारीत व्यस्त असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दर्शनासाठी जाणे शक्य झाले नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी दर्शनासाठी यावे यासाठी हा सगळा अट्टाहास मंडळाकडून करण्यात आला होता.