रिडज गावातील विद्यार्थिनी दहावीच्या शिक्षणासाठी बोरी येथे जातात. गुरुवारी नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता दहा विद्यार्थीनी बोरीकडे शाळेसाठी निघाल्या होत्या. त्या गावातून पायी जात असताना पाठीमागून आलेल्या एका बोलेरो जीपमध्ये (एम.एच.०४ सी.आर.०३२९) त्या बसल्या. त्यांना शाळेत जाण्यासाठी चांदज फाट्यावर उतरायचे होते. परंतू जीपचालकाने ही गाडी जिंतूरकडे वळवल्याने त्यातील तीन मुलींनी घाबरुन जावून धावत्या जीपमधून खाली उड्या टाकल्या. त्यात त्या तिघीही गंभीर जखमी झाल्या. मनिषा रामप्रसाद खापरे, दिपाली सुरेशराव मुटकूळे व मेघना ज्ञानोबा शेवाळे अशी या जखमी मुलींची नावे आहेत. त्यांना तातडीने बोरी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.
दोन विद्यार्थीनींवर प्रथमोपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मेघना शेवाळे या विद्यार्थीनींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी जीपचालकास ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे तर चालकावर कठोर कारवाई करण्याता येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.