धुळे : शिंदखेडा तालुक्यातील भाजपचे आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावल यांच्यावर आज पहाटे दोंडाईचा पोलीस ठाण्यात आदिवासी समाजाला जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरुन ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून हा ॲट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करण्याची मागणी धुळ्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

दसऱ्याच्या दिवशी दोंडाईचा येथे रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रावण दहनाच्या कार्यक्रमाला आदिवासी संघटनांनी विरोध केला होता. यावेळी दोंडाईचा येथे उभारण्यात आलेल्या रावणाच्या पुतळ्याची आदिवासी बांधवांकडून तोडफोड करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर देखील हा रावणाचा पुतळा पुन्हा पूर्ववत करून त्याचे दहन करण्यात आले. रावण दहनाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आदिवासी समाज बांधवांना आमदार जयकुमार रावल यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे.

मुंबई, ठाण्यात पाऊस सुरू; राज्यात यलो अलर्ट, पाहा हवामान विभागाचा ५ दिवसांचा अंदाज
दरम्यान, या प्रकरणी आमदार जयकुमार रावल त्यांचे वडील सरकार साहेब रावल यांच्यासह १५ ते २० जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जयकुमार रावल यांच्या गटाकडून माजी मंत्री हेमंत देशमुख, रविंद्र देशमुख यांच्यासह आदिवासी संघटनेच्या २५ ते ३० जणांवर हिंदू धर्मीय बांधवांच्या धार्मिक भावना दुखावून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी बेकायदेशीर लोकांना जमवून रावण दहन कार्यक्रमात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे सध्या धुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेचं तापले असून जयकुमार रावल यांच्यावर दाखल करण्यात आलेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करण्याची मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

याबाबत दसऱ्याच्या दिवशी दोन गटांमध्ये वाद होऊन दोन गटांकडून एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विभागीय पोलीस अधीक्षकांसह दोंडाईचा पोलिसांमार्फत संपूर्ण तपास करुन जे कोणी या प्रकरणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली.

तर दुसरीकडे हेमंत देशमुख यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ॲट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करण्याची कोणत्या कायद्यात तरतूद आहे हे सांगावे, असं म्हणत हेमंत देशमुख यांच्यावर आजपर्यंत खोटेच गुन्हे दाखल करण्यात आल्याचा देखील गंभीर आरोप यावेळी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे.

प्रियकराला भेटायला मध्यरात्री आर्मी परिसरात शिरकाव, विजेच्या खांबावर चढली, पोलिसांच्या डोक्याला ताप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here