म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रविवारी (१२ जुलै) नियमावली घोषित केली. या नियमावलीनुसार १४ ते १८ जुलै यादरम्यान शहरातील सर्व कंपन्या, दुकाने, किराणा दुकाने पूर्णत: बंद राहणार आहेत. केवळ दूध विक्रेते, वैद्यकीय सेवा, मेडिकल दुकानांसह शासकीय प्रकल्पांची कामे सुरू राहणार आहेत. १९ जुलै ते २३ जुलै या कालावधीत मात्र शिथिलता देण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी लॉकडाउनच्या संदर्भात नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार शहरातील किराणा दुकाने, सर्व प्रकारची किरकोळ व ठोक दुकाने, इतर सर्व प्रकारचे व्यवसाय, सर्व प्रकारच्या कंपन्या बंद राहणार आहेत. सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, उपहारगृहे, लॉज, हॉटेल, मॉल, रिसॉर्ट, बाजार, केशकर्तनालये, सलून, स्पा, ब्युटी पार्लर, सार्वजनिक व खासगी बससेवा, सर्व प्रकारची बांधकामे, पहिले पाच दिवस पूर्णत: बंद राहणार आहेत. १९ तारखेपासून सकाळी ८ ते दुपारी १२ या कालावधीत जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने सुरू राहणार आहेत. यामध्ये किराणा दुकान, दूधविक्रेते, आठवडे बाजार, फेरीवाले, भाजी, फळांचे विक्रेते, मटण, चिकण, अंडी विक्रीची दुकाने उघडता येणार आहेत. तसेच १९ तारखेपासून ई- कॉमर्सच्या वेबसाइट सुरू राहतील; तसेच त्यांचा पुरवठाही सुरळीत होईल. औषध व अन्न उत्पादन प्रक्रिया करणारे उद्योग, त्यांचे पुरवठादार नियमितपणे आपले उद्योग सुरू ठेवतील. मात्र त्यांना ‘एमआयडीसी’च्या पोर्टलवरून परवाना घ्यावा लागणार आहे.

——–

या उद्योगांना मिळणार परवानगी…

आपल्या खासगी अथवा ‘एमआयडीसी’च्या जागेत ज्या कंपन्या अथवा उद्योग आहेत, त्यांना कंपनी चालविता येणार आहे. मात्र, त्यासाठी लॉकडाउनच्या दहा दिवसांच्या कालावधीत कंपनीमधील कामगारांच्या राहण्याची व भोजनाची सोय त्यांना करावी लागणार आहे. कंपनीबाहेर येता येणार नाही. असाच नियम बांधकामांच्या साइटसाठीही लागू करण्यात आला आहे. जे बांधकाम व्यावसायिक आपल्या कामगारांची राहण्याची व भोजनाची सोय करतील, त्यांना परवानगी घेऊन आपली साइट चालू ठेवता येणार आहे. जीवनावश्यक वस्तू, औषधे, तयार केलेले अन्नपदार्थ घरपोच देण्यासाठी सकाळी ८ ते १० या वेळेत परवानगी राहणार आहे.

——

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here