nirmala sitharaman, भाजपचं ‘मिशन बारामती’; मात्र ३८ खासदारांचे संसदीय सहाय्यकच विकास मॉडेल अभ्यासण्यासाठी आले शहरात – parliamentary assistants of 38 mps visited baramati to study the development model
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. या भागातील लोकांना नवा पर्याय देण्यासाठी आम्ही या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करत असल्याचं भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. या माध्यमातून भाजपचं मिशन बारामती सुरू झालेलं असतानाच दुसरीकडे मात्र शहराच्या विकासाचं मॉडेल अभ्यासण्यासाठी तब्बल ३८ खासदारांचे संसदीय सहाय्यक बारामतीच्या दौऱ्यावर आले आहेत.
दिल्लीस्थित पॉलिसी रिसर्च स्टडी या संस्थेचे ३८ खासदारांचे संसदीय सहाय्यक ( लँप- लेजिस्लेटिव्ह असिस्टंट टू मेंबर ऑफ पार्लमेंट) विकासाचे बारामती मॉडेल अभ्यासण्यासाठी दोन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर आले आहेत. खासदारांच्या संसदीय सहाय्यकांनी काल बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र, डेअरी, इनक्युबेशन सेंटर, बारामती नगरपालिका यांची माहिती घेत पाहणी केली. आज हे सहाय्यक बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क, विद्या प्रतिष्ठान या संस्थांना भेट देणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून झालेल्या विकासाच्या नोंदी या सहाय्यकांनी घेतल्या आहेत. नाशिक बस अपघात: मृतांची संख्या वाढण्याची भीती, अशी आहेत जखमींची नावं
खासदारांना त्यांच्या कामकाजात विविध प्रकारची मदत करण्याच्या उद्देशाने पॉलिसी रिसर्च स्टडी या संस्थेच्या वतीने दरवर्षी देशभरातून काही युवकांची नियुक्ती केली जाते. परीक्षा व मुलाखतींद्वारे वेगळे कौशल्य असलेल्या २१ ते २५ वर्ष वयोगटातील युवकांना थेट खासदारांसमवेत दिल्लीत वर्षभर काम करण्याची संधी मिळते. संसदेचे पावसाळी अधिवेशन ते बजेट अधिवेशनापर्यंत हे युवक खासदारांच्या कामात त्यांना थेटपणे मदत करतात. संसदेत उपस्थित करावयाचे प्रश्न, त्यांची भाषणे लिहून देणे, त्यांना इतर कामकाजात मदत करणे अशा स्वरुपाची कामे या युवकांकडून केली जातात.
दरम्यान, बारामतीत प्रत्यक्षपणे विकास कसा झाला आहे, ते पाहण्याच्या उद्देशाने आम्ही बारामतीत आलो आहोत. या दौऱ्याचा अहवाल आम्ही ज्या ३८ खासदारांसमवेत काम करत आहोत, त्यांना सादर करणार आहोत, अशी माहिती या संसदीय सहाय्यकांनी दिली आहे.