सात रस्ता येथील सिटी बस डेपोत घडला होता प्रकार
फिर्यादी पीडित सोलापूर शहर परिवहन विभाग सात रस्ता सी. टी. बस डेपो, सोलापूर येथे हेल्पर म्हणून नोकरीस आहे. रतन उर्फ रतिलाल प्रभु भोसले व सुनिल चंद्रकांत कांबळे हे देखील तेथील कर्मचारी आहेत. २३ऑक्टोबर २०१६ रोजी फिर्यादीस आरोपीने कामाच्या ठिकाणी चेष्टा मस्करी करुन मातीत लोळविले होते. त्यामुळे फिर्यादीचे अंगास माती लागून कपडे घाण झाले. यावरून वाद झाले आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले होते. आरोपी सुनिल कांबळे याने तेथे असलेला प्रेशरने हवा भरणारा पाईप हातात घेवून फिर्यादीच्या कपड्यावर हवा मारण्यास सुरुवात केली. रतन भोसले याच्या सांगण्यावरुन आरोपी सुनिल कांबळे याने फिर्यादीच्या गुदद्वाराला तो हवेचा प्रेशर पाईप लावला. फिर्यादीस श्वास घेण्यास त्रास होवून त्याचे पोट फुगू लागले व त्याला त्रास होवू लागला. फिर्यादीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
नाशिकमध्ये मोठी दुर्घटना! बसमध्ये अग्नितांडव, 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, 38 जण जखमी
पीडित व्यक्तीने सदर बाजार पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती
दोन्ही आरोपींनी संगनमताने फिर्यादीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला भा.द.वि. ३०७ नुसार पीडित व्यक्तिने सदर बझार पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती. त्यावरुन गुन्हा नोंद होवून तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. पीडित व्यक्तीच्या गुदद्वारात प्रेशरने हवा सोडण्यात आल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली होती.
दहा साक्षीदारांनी साक्ष दिली होती
या खटल्यात सरकारपक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. तसेच आरोपीतर्फे एकूण ४ साक्षीदार तपासले. आरोपी रतन उर्फ रतिलाल प्रभु भोसले, सुनिल चंद्रकांत कांबळे यांनी फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी धरुन ५ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी १ हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास १ महिना कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच फिर्यादीस प्रत्येकी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश पारीत केला व नुकसान भरपाई न दिल्यास ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
कोर्टात यांनी कामकाज पाहिले
या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील ॲड. ए. जी. कुलकर्णी यांनी काम पाहिले. तर आरोपीच्या वतीने ॲड. राम कदम यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा तपास पीएसआय एम. एस. बेंबडे, पीएसआय ईश्वर कोकरे, पीएसआय एस. सी. पाटील यांनी केला असून कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल कोटाणे व पोलीस नाईक श्रीमती नदाफ यांनी काम पाहिले.