नाशिकच्या औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास बसला आग लागून झालेला अपघात ताजाच आहे. या अपघातात खाजगी प्रवासी बस जळून खाक झालीये तर या भीषण आगेमध्ये १२ प्रवाशांचा जागीच जळून मृत्यू झाला. या घटनेतील मृतांचा आकडा वाढत असताना पुन्हा बसला आग लागल्याची दुसरी घटना नाशिक जिल्ह्यातून समोर येत आहे. मात्र, सुदैवानं प्रवासी सुखरूप असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
पहाटेची घटना :
नाशिकमध्ये पहाटे झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेमुळे नाशिकचं काय तर संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी असल्याचं म्हटलंय. पहाटे मिरची हॉटेल जवळ झालेल्या घटनेत जवळपास ३३ प्रवासी जखमी झाले आहेत. तर १२ प्रवाशांचा जागीच जळून मृत्यू झालाय. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये दाखल झालेले असतानाच नाशिक जिल्ह्यातील पुन्हा धावत्या बसला आग लागल्याची घटना घडली आहे.
नाशिकमध्ये झालेल्या पहिल्या अपघातात खाजगी बसची ट्रकला धडक झाल्यामुळे आग लागल्याची माहिती आहे. मात्र, या दुसऱ्या घटनेत आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आग लागल्यानंतर काही क्षणात बसच्या समोरच्या भागातून मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाला निघायला लागल्या आणि मोठ्या प्रमाणात धूर देखील झाला. तर रस्त्यावरच झालेल्या या घटनेने रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांना देखील धोका निर्माण झाला आहे.
तसेच काही दिवसांपासून वाहनांना अचानक चालताना आग लागण्याच्या घटना घडत आहे. तर आजच्या आज नाशिकमध्ये बसला आग लागल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये बसने प्रवास करण्याची भीती वाढू शकते. या घटनांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.