सोलापूर : राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर आपल्या एका फोन संभाषणामुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील हे राज्यभरात चर्चेत आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही पाटील यांना विविध व्यासपीठांवरून भाषणासाठी संधी दिली जात आहे. मात्र याच शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघातील विविध प्रश्न सातत्याने समोर येऊ लागल्याने पाटील यांनी भाषणबाजी करण्यापेक्षा मतदारसंघातील प्रश्नांमध्येही लक्ष घालावं, असा सल्ला देत विरोधकांकडून टीका केली जाऊ लागली आहे.

सांगोला तालुक्यात दक्षिण भागात असलेल्या जुजारपूर येथील ओढा दर पावसाळ्यात ओसंडून वाहतो. त्यामुळे येथील शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी यांना या पाण्यातूनच धोकादायक रीतीने प्रवास करण्याची वेळ येते. या ओढ्यावर सध्याचा असणारा पूल जमीन पातळीलाच असल्याने पावसाळ्यात कायम या पुलावरून पाणी वाहत अस. त्यामुळे जुजारपूर जुनोनी या रस्त्यावरून धोकादायक पद्धतीने वाहतूक असते. तसंच दुसऱ्या बाजूला असणाऱ्या पाटील वस्ती येथे जाणाऱ्या मार्गावर पुलंच नसल्याने तेथील प्रवासही जीवघेणा ठरत आहे.

२० वर्षीय प्रथमेशची मृत्यूशी झुंज अपयशी; दहीहंडी उत्सवात झाला होता गंभीर जखमी

या ठिकाणी उंच पूल बांधल्यास पावसाळ्याच्या चार महिन्यात या परिसरातील ग्रामस्थांची होणारी अडचण कायमची दूर होणार आहे. मात्र या परिस्थितीकडे लक्ष देण्यासाठी आमदार शहाजी पाटील यांना वेळ नसल्याची टीका शिवसेनेचे नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. विशेष म्हणजे जुजारपूर हे गाव शहाजी पाटील यांच्यामागे राजकीयदृष्ट्या कायम खंबीरपणे उभे राहिल्याचे दरवेळी मतदानातून दिसत असते. मात्र आपल्याच मतदारांच्या प्रश्नाबाबत ते लक्ष देण्यास तयार नसल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

दरम्यान, विरोधकांकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर तरी आमदार शहाजी पाटील हे मतदारसंघातील या प्रश्नाकडे लक्ष देतात का, हे पाहावं लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here