कुर्ल्यातील नवीन टिळक नगर रेल व्ह्यू इमारतीत ही मोठी इमारत आहे. ही आग सध्या इमारतींच्या काही मजल्यांपर्यंत पोहोचली आहे. अग्निशमन दल येईपर्यंत स्थानिक नागरिकांनी आगीत अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. सध्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली आहे.
दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. चेंबूर पूर्व भागात लोकमान्य टिळक टर्मिनल जवळ न्यू टिळक नगर परिसरात ही आग लागली आहे. १३ मजली इमारतीच्या बाराव्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती आहे. कोणालाही दुखापत झाल्याचं अद्याप वृत्त नाही. पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान सध्या आग विझवण्याच्या कामाला लागले आहेत.

कुर्ल्यात भीषण आग
अग्निशमन दलाचे जवान येण्यापूर्वीच या आगीने रौद्र रुप धारण केलं होतं. धुराचे मोठाले लोट आकाशात दिसत होते. यावेळी काही स्थानिकांनी आगीत अडलेल्या एका महिलेला वाचवण्यात यश मिळवलं. ज्या घरात आग लागली त्याच घरातील ही महिला असल्याचं सांगितलं जात आहे. तिला खिडकीच्या सहाय्याने दोन तरुणांनी मोठ्या जिकरीने आगीतून बाहेर काढलं. त्यानंतर खिडकी खालील स्लॅबवर बसून ते अग्निशमन दलाच्या जवानांची वाट पाहात होते.
अतिशय भीतीदायक दृष्य
इमारतीच्या १२ व्या मजल्याला आग लागली आहे. यावेळी अनेक जण त्यांच्या घरात अडकून पडलेत. ते रहिवासी खिडकीत येऊन हात दाखवत होते की आम्हाला वाचवा. सर्वत्र धुराचे लोट पसरलेले पाहायला मिळत आहेत. जीव वाचवण्यासाठी हे रहिवाशी खिडकीत येऊन तोंडाला ओला बोळा धरुन बसलेलेही पाहायला मिळाले. तर चौथ्या मजल्यावर अडकलेल्या एका महिलेला दोरीच्या सहाय्याने वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसले.