सांगोला : सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी पुन्हा एका राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. ‘पवारांचे जोडे उचलूनही पवार काका-पुतण्याने मला २० वर्षे कोंडून ठेवले आणि आता हा म्हणतोय पवारांवर बोलायचे नाही,’ अशी फटकेबाजी आज आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली. अभिजीत पाटील यांच्या सांगोला येथील धाराशिव साखर कारखान्याच्या मोळी टाकण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रवादीचे राज्य सचिव आणि आमदार शहाजी पाटील यांचे मित्र व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी शहाजी पाटलांना भाषण करताना डिवचले. सध्या राज्यात फक्त एकाच नेत्याच्या भाषणांची जोरदार चर्चा असल्याचा टोला लगावताना दीपक साळुंखे यांनी आता आजपासून पवार साहेबांवर बोलायचे नाही, असा संकल्प करण्याचा चिमटा शहाजीबापू यांना घेतला. यावर शहाजीबापू पाटील काय उत्तर देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होते.

Video : मुंबईत रहिवाशी इमारतीला भीषण आग, महिलेच्या सुटकेसाठी स्थानिकांची धाडसी कामगिरी

शहाजीबापूंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आपण पवार यांच्यासाठी काय काय केले हे सांगताना आम्ही त्यांची चप्पल सुद्धा उचलून त्यांच्या पायापाशी ठेवली होती. मात्र पवार काका-पुतण्याने २० वर्षे मला घरात कोंडून ठेवल्याचा टोला लगावला.

सांगोल्यात प्रत्येक वेळी पवार यांनी शहाजीबापूंच्या विरोधात शेकापला पाठिंबा देत राहिल्याने शहाजीबापू यांची राजकीय कोंडी होत होती. पवारांच्या मदतीमुळे शेकापचे गणपतराव देशमुख विजयी होत आणि शहाजीबापू पराभूत होत असत. आपल्या राजकीय वनवासाला शरद पवार आणि अजित पवार हे दोघेच जबाबदार असल्याचा राग शहाजीबापू पाटील यांच्या डोक्यात कायम आहे. त्यामुळेच पवारांवर टीका करणे बंद करा म्हणल्यावर पवार काका पुतण्याने २० वर्षे मला घरात डांबून ठेवले आणि आता मला त्यांच्यावर बोलू नका असं हा म्हणतोय, असं म्हणत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here