मुंबई: निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवण्याचा अंतरिम निर्णय शनिवारी रात्री जाहीर केला. या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर नव्याने उभारी घेऊ पाहत असलेल्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार मुंबईतील अंधेरी पूर्वच्या विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे आणि शिंदे या शिवसेनेच्या दोन्ही गटांना पक्षाचं नाव किंवा निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेनेचं चिन्ह गोठवले जाणार, हा निर्णय अनेकांना अपेक्षित होता. त्यामुळे फक्त शिवसेनेलाच मोठा धक्का बसेल, असा अंदाज बांधला जात होता. परंतु, निवडणूक आयोगाने आणखी एक पाचर मारून ठेवल्यानं बाळासाहेबांच्या शिवसेनेशी इमान सांगणाऱ्या शिंदे गटाचीही गोची झाली आहे.


निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एक पोस्ट केली आहे. जिंकून दाखवणारच, अशा दोन शब्दांची ही पोस्ट आहे. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो या पोस्टमध्ये आहे. उद्धव ठाकरेंच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांचा बाळासाहेबांसोबतचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टवर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला आहे.
उद्धव ठाकरेंना धक्का, पण शिंदे गटाचंही प्लॅनिंग फिस्कटलं, निवडणूक आयोगाच्या निर्णयाने खेळच बिघडला
शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हरिवंशराय बच्चन यांची प्रसिद्ध कविता पोस्ट केली आहे. आदित्य यांच्याकडून अग्निपथ कविता पोस्ट करण्यात आली आहे. उद्धव आणि आदित्य यांच्या इन्स्टाग्राम पोस्ट पाहता पिता-पुत्र जोरदार संघर्ष करण्याच्या मनस्थितीत असल्याचं दिसत आहे.

ठाकरेंसोबत शिंदेंनाही धक्का
शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्हा गोठवलं जाऊ शकतं व नव्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते, अशी मानसिक तयारी शिवसेनेच्या नेतृत्त्वानं केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या चिन्हाबाबात निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयानं उद्धव ठाकरे यांना फारसा धक्का बसलेला नाही. कारण हा निर्णय तसा अपेक्षितच होता. मात्र, शिवसेना हे नाव वापरायलाही आयोगाने बंदी घातल्यानं उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठा पेच उभा राहिला आहे.
शिवसेनेला आणखी एक धक्का, शिंदे गटावर गंभीर आरोप करणारा नगरसेवक दोन वर्षांसाठी तडीपार
दुसरीकडे चिन्हाच्या लढाईत आपल्यासारखे गमावण्यासारखे काहीच नाही, अशा धुंदीत असलेल्या शिंदे गटालाही या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत शिंदे गटाकडून सातत्याने आम्ही बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेचे विचार पुढे नेत आहोत, असा प्रचार केला जात होता. मात्र, आता शिवसैनिक हे संबोधन वापरणे कसे थांबवता येईल, असा प्रश्नही आहे. यावर ठाकरे गट आणि शिंदे गट काय मार्ग काढणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here