मात्र, संदीप देशपांडे यांच्या ट्विटचा एकूणच सूर पाहता मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्वस्व हिरावल्या गेलेल्या उद्धव ठाकरे यांना सहानुभूतीचा कोणताही फायदा मिळू नये, यासाठी आतापासूनच तयारी सुरु केल्याचे दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी मनसे म्हणजे संपलेला पक्ष असल्याचे म्हटले होते. तेव्हापासून मनसेकडून शिवसेनेला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली जात नाही. मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेवर निशाणा साधला होता.बंडखोरांपुढे लोटांगण घालून शेवटपर्यंत सत्ता टिकविण्याचा लाचार हव्यास नडला. ‘त्यांची’ जर लगेचच पक्षातून हकालपट्टी केली असती तर किमान पक्षावर नाव व चिन्ह गमावण्याची नामुष्की ओढावली नसती.असो,तरी पण आम्ही तुम्हाला संपलेला पक्ष बोलणार नाही, असे राजू पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
उद्धव ठाकरेंना धक्का, पण शिंदे गटाचंही प्लॅनिंग फिस्कटलं
शिवसेनेचे चिन्ह गोठवले जाणार, हा निर्णय अनेकांना अपेक्षित होता. त्यामुळे फक्त शिवसेनेलाच मोठा धक्का बसेल, असा अंदाज बांधला जात होता. परंतु, निवडणूक आयोगाने आणखी एक पाचर मारून ठेवल्याने बाळासाहेबांच्या शिवसेनेशी इमान सांगणाऱ्या शिंदे गटाचीही गोची झाली आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्हा गोठवले जाऊ शकते व नव्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते, अशी मानसिक तयारी शिवसेनेच्या नेतृत्त्वाने केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या चिन्हाबाबात निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाने उद्धव ठाकरे यांना फारसा धक्का बसलेला नाही. कारण हा निर्णय तसा अपेक्षितच होता. मात्र, शिवसेना हे नाव वापरायलाही आयोगाने बंदी घातल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठा पेच उभा राहिला आहे. तर दुसरीकडे चिन्हाच्या लढाईत आपल्यासारखे गमावण्यासारखे काहीच नाही, अशा धुंदीत असलेल्या शिंदे गटालाही या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत शिंदे गटाकडून सातत्याने आम्ही बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेचे विचार पुढे नेत आहोत, असा प्रचार केला जात होता. मात्र, आता शिवसैनिक हे संबोधन वापरणे कसे थांबवता येईल, असा प्रश्नही आहे. यावर ठाकरे गट आणि शिंदे गट काय मार्ग काढणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.