मिळालेल्या माहितीनुसार, चालक विलास पाटील आणि महिला वाहक यु.आर. सडोले हे ४० प्रवाशांसह सांगलीहून कोल्हापूरकडे येत होते. यावेळी या एसटीमध्ये शिरोळ तालुक्यातील उदगाव येथून फक्रुद्दीन मुजावर यांना त्यांच्या मुलाने जयसिंगपूरमधून एसटीमध्ये बसवले, मुजावर हे कोल्हापूरला आपल्या मुलीकडे निघाले होते. हातकणंगले तालुक्यातील चोकाकजवळ एसटी आली असतानाच मुजावर यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तोंडाला फेस येऊ लागल्याने महिला वाहक यांनी चालक पाटील यांना तत्काळ माहिती दिली.
दरम्यान, चालकाने कसला ही विचार न करता प्रसंगावधान राखत एसटी थेट हेरल्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणली. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांनी मुजावर यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती हातकणंगले पोलिसांसह कोल्हापूर डेपोमध्ये देण्यात आली. दुसरीकडे कोल्हापूरमध्ये मुजावर यांचे नातेवाईक वाट पाहत थांबले होते. बस वेळेत न पोहोचल्याने त्यांनी डेपोत चौकशी केल्यानंतर त्यांना ही धक्कादायक माहिती समजली. त्यानंतर नातेवाईक हेरले प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रवाना झाले. मात्र, लेकीला भेटायला जाणाऱ्या या बापाची दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.