मुंबई : शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण या दोन्हीवर दोन्ही गटांनी दावे केल्यानंतर शनिवारी सायंकाळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. ४ तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या या बैठकीअंती शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे दोन्ही गोठवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या राजकीय भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सर्व घडामोडींबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
‘चिन्ह गोठवल्यामुळे शिवसेना संपणार नाही. तिथली तरुण पिढी आणखी जोमाने उभी राहील आणि आपली शक्ती वाढवेल,’ असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. तसंच निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरही पवार यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट) आहे. या निर्णयाचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे. चिन्ह गोठलं, शिवसेना नाव वापरता येणार नाही; आता ठाकरे, शिंदेंसमोर काय पर्याय? जाणून घ्या
दरम्यान, आगामी काळात ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी, असा सल्लाही शरद पवार यांनी दिला आहे.
शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निकाल लोकांसाठी धक्कादायक असला तरी अनपेक्षित मात्र नक्कीच नाही. चिन्ह गोठवलं म्हणजे आपले मनसुबे साध्य होतील असा त्रयस्थांचा अंदाज असला तरी लोकांच्या मनातली निष्ठा मात्र गोठवता येणार नाही. दसरा मेळाव्यात दिसलेली निष्ठा निवडणुकांमध्येही निश्चित दिसेल. धनुष्यबाणाचं चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठल्याने खऱ्या शिवसैनिकाला अत्यंत वेदना होत असणार, हे मात्र खरं आहे. पण ज्यांना त्रास होत नसेल त्यांनी दुसऱ्यांची स्क्रिप्ट स्वीकारली असंच म्हणावं लागेल,’ असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.