‘शिंदे गटातील आमदारांची फसवणूक’
‘शिवसेना आपली असून भविष्यात धनुष्यबाण आपल्याला मिळेल, असं सांगून एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची फसवणूक केली आहे. मात्र आता निवडणूक आयोगाच्या निकालानंतर या आमदारांना सावरता-सावरता त्यांचा पूर्ण वेळ निघून जाईल. आमदारांना आता सांगायचं काय, या विचारने त्यांना घाम फुटला असेल. त्यामुळे आज शिंदे गटाने तातडीची बैठक बोलावली असेल,’ असा हल्लाबोलही नितीन देशमुख यांनी केला आहे.
‘भाजपचा कट, मात्र शिवसेना पुन्हा उभी राहणार’
‘शिवसेना संपवण्यासाठी भाजपने हा संपूर्ण कट केला आहे. रामाचा धनुष्यबाण गोठवण्याचं पाप भारतीय जनता पार्टी आणि या शिंदे गटाने केलं. त्यामुळे रामाच्या नावावर या देशामध्ये आणि महाराष्ट्रात मतं मागण्याचा नैतिक अधिकार भाजपने गमावला,’ असं आमदार देशमुख यांनी म्हटलं आहे. तसंच ‘शिवसेनेचं चिन्ह गोठवलं गेल्याची बातमी येताच संपूर्ण देशात एक सहानुभूतीची लाट उद्धवसाहेबांबद्दल पुन्हा पसरली. त्याच पद्धतीने जेव्हा उद्धव साहेब नवीन चिन्ह घेतील, तेव्हा शिवसेनेचे ते चिन्ह एका मिनिटात सर्वत्र पोहोचल्याशिवाय राहणार नाही. उद्धवसाहेबांनी कोणतंही चिन्ह घेतलं तरी त्या चिन्हाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत, याच्याबद्दल कोणतीही शंका नाही,’ असंही नितीन देशमुख म्हणाले.