मुंबई: निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवण्याचा अंतरिम निर्णय शनिवारी रात्री जाहीर केला. या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर नव्यानं उभारी घेऊ पाहत असलेल्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचं चिन्ह गोठवलं जाणार, हा निर्णय अनेकांना अपेक्षित होता. त्यामुळे फक्त शिवसेनेलाच मोठा धक्का बसेल, असा अंदाज बांधला जात होता. परंतु, निवडणूक आयोगानं आणखी एक पाचर मारून ठेवल्यानं बाळासाहेबांच्या शिवसेनेशी इमान सांगणाऱ्या शिंदे गटाचीही गोची झाली आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानं शिवसेनेच्या दोन्ही गटांसमोर आव्हान निर्माण झालं आहे. नवं नाव आणि चिन्ह निवडायचं, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची कसरत दोन्ही गटांना करावी लागेल. शिवसेनेच्या दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरता येणार नाही. त्यांना नवं नाव आणि चिन्ह घ्यावं लागेल. त्यासाठी त्यांना उद्यापर्यंतची मुदत आहे. त्यामुळे सेनेच्या दोन्ही गटांसमोर आव्हान आहे. मात्र यामुळे भाजपला आनंद झाल्याचं दिसत आहे.
एकनाथ शिंदे इन ऍक्शन! नाव, चिन्हाबद्दल मोठा निर्णय होणार; दुपारच्या बैठकीनंतर डाव टाकणार?
भाजपच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डेकर यांनी ट्विटच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या निकालावर भाष्य केलं आहे. ‘हा तर सत्याचा, खऱ्या शिवसैनिकांच्या आणि शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय! बाळासाहेब एकदा म्हणाले होते की ज्या दिवशी शिवसेना काँग्रेससोबत जाईल, त्या दिवशी मी माझं हे दुकान बंद करेल! त्यांचं हे विधान आज सत्य होताना दिसत आहे,’ असं बोर्डेकरांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दुसरीकडे भाजपचे नेते मोहित कंबोज भारतीय यांनी ठाकरे गटाला डिवचलं आहे. त्यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात मर्सिडिजचा लोगो आणि पेंग्विन आहे. निवड तुमची, असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ठाकरे गटानं मर्सिडीज किंवा पेंग्विन चिन्ह घ्यावं, असं कंबोज यांनी अप्रत्यक्षपणे सुचवलं आहे.
ठाकरे, शिंदेंमध्ये नवा वाद; दोन्ही गटांचा सेम नावावर क्लेम; कुरघोडीच्या राजकारणात कोणाचा गेम?
मोहित कंबोज यांनी दुसऱ्या एका ट्विटमधूनही ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘कोणाचाच अहंकार टिकत नाही. दुसऱ्यांचं घर तोडायला निघाले होते. स्वत:चं घर कधी उद्ध्वस्त झालं ते कळलंही नाही. देवाच्या काठीला आवाज नसतो. कोण म्हणतं अहंकार केवळ रावणाला मारतो? अहंकार धनुष्यबाणालादेखील मारतो’, अशा शब्दांत कंबोज यांनी ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here