मुंबई : अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण हे चिन्ह आपल्यालाच मिळावं, यासाठी दोन्ही गटांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या दाव्याप्रतिदाव्यांची पडताळणी करून, या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना हे नाव, तसंच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही गोठवण्याचा अंतरिम निकाल निवडणूक आयोगाने शनिवारी दिला. या दोन्ही गटांना शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही. दोन्ही गटांना त्यांच्या पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबत पर्याय देण्याच्या सूचना आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार आता उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या चिन्हासाठी तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे दिले आहेत. याबाबत शिवसेना खासदार अरविंत सावंत यांनी माहिती दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पक्षचिन्हासाठी त्रिशूल, मशाल आणि उगवता सूर्य हे तीन पर्याय दिले आहेत, असं अरविंत सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसंच पक्षाच्या नावासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही दोन नावे दिल्याचंही सावंत यांनी स्पष्ट केलं आहे.

धनुष्यबाण गोठवला, मातोश्रीवर तातडीची बैठक, संध्याकाळी ६ वाजता उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद

दरम्यान, निवडणूक आयोगाचा निर्णय शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे या दोन्ही गटांत जोरदार हालचाली सुरू झाल्या. चर्चा, खलबते यांना दोन्ही गटांत जोर आला होता. शिवसेनेच्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांची आज, रविवारी दुपारी ‘मातोश्री’वर बैठक झाली. तर, शिंदे गटाचीही बैठक थोड्याच वेळात होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here