अहमदनगर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वादात केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याचा फायदा कोणाला, तोटा कोणाला, याची चर्चाही सुरू आहे. अशातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि शिंदे सरकारमधील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मोठं विधान केलं आहे. ‘सत्याचा विजय होतोच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दृष्टीने हा फार मोठा विजय आहे, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा मोठा नैतिक पराभव,’ असं विखे पाटील म्हणाले.

संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे एका कार्यक्रमाठी विखे पाटील आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी केंद्र सरकार हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे.

भाऊ गेला, विश्वासू सहकारी गेले, आता शेवटची लढाई, नंतर आपल्यासमोर कुणी टिकणार नाही: उद्धव ठाकरे

या आरोपांबाबत पत्रकारांनी विचारले असता विखे पाटील म्हणाले की, ‘केंद्र सरकारवर आरोप करण्यापलीकडे उद्धव ठाकरेंकडे काय शिल्लक आहे? त्यांनी जनाधार गमावला, सरकार गमवलं. आता स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. राहिलेले थोडेफार जे काही संघटन आहे ते कसे टिकवता येईल त्याच्यावर लक्ष केंद्रित करावे. आतापर्यंत दुर्दैवाने त्यांना चुकीचे सल्लागार मिळाले होते. त्यांचे प्रवक्ते बेताल विधाने करत होते. सत्याचा विजय होतोच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दृष्टीने हा फार मोठा विजय आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा मोठा नैतिक पराभव आहे,’ असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एकीकडे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटानेही चिन्हाची मागणी केली असताना आयोगाने चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्याने हा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी दिलासा कसा, असा प्रश्न आता विखे पाटील यांच्या वक्तव्यानंतर उपस्थित केला जाऊ लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here