उद्धव ठाकरेंचं संबोधन; ठळक मुद्दे कोणते?
१. बंडखोरांना पुन्हा ओपन चॅलेंज
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे यांनी आमदार-खासदारांसह बंड केल्यापासून उद्धव यांच्यासह त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे वारंवार बंडखोर नेत्यांवर निशाणा साधत आहेत. जाहीर सभांमधून गद्दार असा उल्लेख करत ठाकरे पिता-पुत्राकडून बंडखोरांना डिवचलं जात आहे. आज फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर हल्ला चढवला आणि त्यांना थेट आव्हानही देऊन टाकलं. ‘बंड करणाऱ्या नेत्यांना काळीज तर आहे, मात्र ते उलट्या काळजाचे आहेत. ते नेते थेट शिवसेना संपवायला निघाले आहेत. बाळासाहेबांचा पुत्र त्यांना मुख्यमंत्रिपदी नको होता. म्हणून त्यांनी भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपद मिळवलं. इथंपर्यंत ठीक होतं, मात्र आता त्यांना तर शिवसेनाप्रमुख व्हायचं आहे. हे जरा अती झालं. या बंडखोरांना आज मी पुन्हा आव्हान देतो. तुमच्यामध्ये खरंच हिंमत असेल तर तुम्ही बाळासाहेब ठाकरे हे नाव न वापरता मैदानात या आणि निवडणूक लढवून दाखवा,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह इतर आमदारांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
२. निवडणूक आयोगावर अप्रत्यक्ष दबाव?
शिवसेनेत सुरू असलेल्या संघर्षात निवडणूक आयोगाकडून आमच्यावर अन्याय केला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या गटातील विविध नेते करत आहेत. आज दुपारी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी थेट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एका कवितेचा उल्लेख करत निवडणूक आयोगावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आता जनतेशी संवाद साधताना निवडणूक आयोगाला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ‘आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न कोर्टात प्रलंबित असताना पक्षचिन्हाबाबत निर्णय देऊ नये, अशी आमची मागणी होती. मात्र निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आणि नवीन चिन्ह सुचवण्यासाठी पर्याय पाठवण्याच्या सूचना त्यांनी आम्हाला काल केल्या. त्यानुसार आम्ही त्रिशूळ, मशाल आणि उगवता सूर्य या तीन चिन्हांचा पर्याय दिला आहे. तसंच पक्षाच्या नावासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही तीन नावे सुचवली आहेत. आता निवडणूक आयोगाने यावर लवकरात लवकर निर्णय द्यावा. म्हणजे आम्हाला जनतेसमोर जाता येईल,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आयोगाकडे तात्काळ निर्णयाचं आवाहन केलं आहे.
३. ‘वापरणार आणि फेकून देणार’, शिंदे गटातील आमदारांना करून दिली धोक्याची जाणीव
भाजपने एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या माध्यमातून शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचा आरोप सुरुवातीपासूनच ठाकरे आणि त्यांच्या समर्थक नेत्यांकडून करण्यात येत आहे. आज उद्धव ठाकरे यांनी एक उदाहरण देत बंडखोर आमदारांना धोक्याची जाणीव करून दिली आहे. ‘एखादी जाहिरात बघून आपण सरबताची बाटली खरेदी करतो. ती घरी आणून जपून वापरतो. मात्र ते सरबत पिऊन झाल्यानंतर कचऱ्याच्या डब्यात बाटली टाकून देतो. तसंच या मिंधे गटाचं भाजपकडून केलं जाईल. यांचा वापर संपला की यांनाही फेकून दिलं जाईल आणि आता वापर संपलाच आहे. कारण यांच्या माध्यमातून शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवायचं होतं, ते तर करून झालं आहे,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.