नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात सध्या मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. अशात रविवारी अनेक ठिकाणी पावसाचा कहर होता. दिल्लीत इमारत कोसळून झालेल्या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला. त्याचवेळी गुरुग्राममध्ये तलावात बुडून सहा मुलांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये घरे पडून आणि वीज पडून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार नोएडा, गाझियाबाद, लखनऊ, कानपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर नागरिकांनाही पावसाचा अंदाज घेत बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भारतातही लहान मुलांचा झाला होता मृत्यू; कफ सिरप बनवणाऱ्या ‘त्या’ कंपनीबाबत धक्कादायक माहिती मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत रविवारी मोठी दुर्घटना घडली. दिल्लीच्या लाहोरी गेट येथील फरास खाना परिसरात एक इमारत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ढिगाऱ्याखाली अनेक जण गाडले गेले होते, त्यांना वाचवण्यात यश आले आहे. या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला.
अशात गुरुग्राममध्ये मुसळधार पावसात तलावात आंघोळीसाठी गेलेल्या ६ मुलांचा बुडून मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी सर्व मुलांचे मृतदेह बाहेर काढले. सर्व मुले जवळच्या शंकर विहार कॉलनीतील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.