म. टा. खास प्रतिनिधी, : लंडनमधील वाग्दत्त पतीने शिवडी येथील एक तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांना साडेसात लाख रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघड झाले आहे. विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावर आपले खोटे प्रोफाइल तयार करून ही फसवणूक करण्यात आली. विशेष म्हणजे लॉकडाउन असतानाही लंडनहून भारतात आल्याचे भासवून हे पैसे उकळण्यात आले. या प्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यवसायाने आर्किटेक्ट असलेल्या २६ वर्षीय तरुणीने लग्नासाठी एका विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. संपर्कासाठी या तरुणीने आई आणि वडील दोघांचेही मोबाइल क्रमांक प्रोफाइलवर ठेवले. काही दिवसांनी अंकुश लोखंडे या नावाने या तरुणीला रिक्वेस्ट आली. तिने या तरुणाचे प्रोफाइल तपासला असता त्याने युनिव्हसिर्टी ऑफ सिंगापूरमधून बँचलर ऑफ आर्किटेक्ट तसेच मास्टर्स ऑफ ऑर्किटेक्टच्या पदव्या घेतल्याचे दिसून आले. आपल्या मनाप्रमाणे पती मिळत असल्याने या तरुणीने आईवडिलांच्या सल्ल्याने अंकुश याची रिक्वेस्ट स्वीकारली. संपर्कासाठी मोबाइल क्रमांकाची देवाणघेवाण करण्यात आल्यानंतर अंकुश या तिच्या आईवडिलांशी बोलला. सध्या लंडनमध्ये स्थायिक असल्याचे सांगून लग्न ठरले तर साखरपुडा करण्यासाठी मुंबईत येऊ शकतो असे अंकुशने सांगितले. तरुणी आणि तिच्या घरच्यांनीदेखील होकार दिला. लॉकडाउन सुरू असून विदेशांतील विमान उड्डाणे बंद आहेत याचा विचारही कुणाच्या मनाला शिवला नाही.

सर्व काही ठरल्यानंतर अंकुशने तरुणीच्या कुटुंबीयांना विमानाचे तिकीट व्हॉट्सअपवर पाठविले. त्यानुसार त्यांनी इकडे साखरपुड्याची तयारी सुरू केली. ठरलेल्या दिवशी दिल्ली विमानतळावरून तरुणीच्या वडिलांना फोन आला. अंकुश लोखंडे हा तरुण आला असून त्याच्याकडे परवानगीपेक्षा अधिक साहित्य आहे. त्यासाठी ४५ हजार रुपये भरावे लागतील असे कस्टमच्या महिला अधिकाऱ्याने सांगितले. अंकुश यानेही आपल्याकडील एक बँक कार्ड स्वाइप होत नसल्याचे सांगितले. मी सोन्याचे दागिने आणि परदेशी चलन आणले असल्याने दंडाचे पैसे भरावे लागतील असेही सांगितले. त्यानुसार तरुणीच्या वडिलांनी सुरुवातीला ४५ हजार रुपये ऑनलाइन वळते केले. त्यानंतर पुन्हा फोन आला आणि अंकुश याच्या २९ लाखांचे दागिने असल्याने आणखी ४ लाख ८४ हजार रुपये भरावे लागतील असे सांगण्यात आले. तरुणीच्या वडिलांनी ही रक्कमही पाठवली. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा फोन आला, विमानतळावर १४ दिवस विलगीकरणात राहावे लागणार असून त्यासाठी अडीच लाख भरावे लागतील. होणारा जावई अडचणीत असल्याने कोणताही विचार न करता तरुणीच्या वडिलांनी ही रक्कमही दिलेल्या खात्यावर पाठवली. यानंतर मात्र फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनतर त्यांनी अंकुश तसेच, कथित कस्टम अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र मोबाइल बंद येत होते. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here