मुंबई : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे ‘शिवसेना’ हे नाव व ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून तीन नवे पर्याय देण्यात आले आहेत. ठाकरे गटाने आपल्या पक्षासाठी ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘मशाल’ या निवडणूक चिन्हांचा पर्याय दिला आहे. तर पक्षनावासाठी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ आणि ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ ही नावे नोंदणीसाठी दिली आहेत. मात्र ही नावेही ठाकरे गटाला मिळू नयेत, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाचे व्यूवरचना आखल्याचं बोललं जात आहे. शिंदे गटाकडूनही त्रिशूळ आणि मशाल या चिन्हांवर दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह इतर बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे यांनी आज वरळी या आपल्या विधानसभा मतदारसंघात रस्त्यावर उतरून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांनी शिंदे गटाकडून सुरू असलेल्या हालचालींविषयी विचारलं असता आदित्य यांचं आक्रमक रूप पाहायला मिळालं. ‘हे अपेक्षित नव्हतं, पण झालेलं आहे. आता लढायचं आणि जिंकायचं असं आता आम्ही ठरवलं आहे. राज्यात जे सध्या चाललं आहे ते घटनाबाह्य आहे, मुळात गद्दारांचं जे सरकार आहे, तेच घटनाबाह्य आहे. खोके सरकारमधील गद्दारांचा गट निर्लज्जपणे राजकारणाची पातळी खाली घेऊन जात आहे. एवढं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात आणि देशातही कधी पाहायला मिळालं नव्हतं. शिवसेना संपवण्याचा आसुरी आनंद ते मिळवू पाहात आहेत, मात्र हा आनंद त्यांना कधीच मिळणार नाही,’ अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला फटकारलं आहे. तसंच महाराष्ट्रातील जनता शिवसेनेच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या पाठिशी उभी आहे, असंही आदित्य यांनी ठामपणे सांगितलं आहे.

Shivsena: धनुष्यबाणाचं चिन्हं गोठवलं, सुनावणीसाठी कोर्टात जाता जाता संजय राऊतांनी शिवसेनेचं ‘स्पिरीट’ दाखवलं

एकनाथ शिंदेंना आणि इतर मंत्र्यांना थेट आव्हान

बंडखोर आमदारांवर टीका करता आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा आव्हान दिलं आहे. ‘शिवसेनेतून बंडखोरी करून गद्दार मुख्यमंत्रिपदी आणि मंत्रिपदी बसले आहेत, मात्र त्यांना वार करायचे असतील तर समोरून करावेत. पाठीत वार करू नये. स्वत:ची ओळखी वापरून समोर या. माझे आजोबा आणि वडिलांनी या ४० गद्दारांना राजकीय जन्म दिला, सामाजिक ओळख दिली. मात्र आता तेच शिवसेनेचं चिन्ह आणि नाव वापरून आमच्यावर वार करत आहेत. आजही माझं या गद्दारांना आव्हान आहे की राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जा,’ असं ते म्हणाले.

दरम्यान, या देशात लोकशाहीचं पुढे काय होणार, हे ठरवणारी ही लढाई आहे. संपूर्ण देशाच्या दृष्टीने ही महत्त्वाची लढाई आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here