एका अज्ञात व्यक्तीनं खासगी बँकेला २.७७ लाख रुपयांचा चुना लावला आहे. खारमधील एटीएममधून अज्ञातानं रोकड काढली. पण हा व्यवहार बँकेच्या रेकॉर्डवर आलाच नाही. त्यासाठी ठगानं नवी ट्रिक वापरली. अज्ञातानं ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे ४ व्यवहार केले.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहेत. ६ ऑक्टोबरला बँकेच्या दक्षता पथकानं संबंधित शाखेला काही संशयास्पद व्यवहारांची माहिती दिली. खार पश्चिमेतील लिकिंग रोडवरील एटीएममध्ये संशयास्पद व्यवहार झाल्याचा अहवाल पथकानं बँकेला दिला. अज्ञात व्यक्तीनं क्लोन केलेल्या डेबिट कार्डचा वापर करून १ ऑक्टोबरला ५० हजार रुपये काढल्याचं तपासातून उघडकीस आलं.
एटीएममधून रोकड बाहेर येत असताना आरोपीनं एटीएमची वायर प्लगमधून बाहेर काढली. त्यामुळे मशीन बंद झालं. मात्र संबंधित व्यक्तीच्या खात्यातून पैसे वजा झाले नाहीत. आरोपीनं अशाच प्रकारे दुसरा व्यवहार केला आणि ५९ हजारांची रोकड काढली. २ आणि ३ ऑक्टोबरला अनुक्रमे ८० हजार आणि ८८ हजार रुपये काढण्यात आले, अशी आकडेवारी एफआयआरमध्ये आहे. या रॅकेटमध्ये अनेकांचा समावेश असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आम्ही याचा तपास करत आहोत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असं पोलीस म्हणाले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.