Uttarakhand Avalanche: उत्तराखंडमध्ये झालेल्या हिमस्खलनात २५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. दोक्रिअनी येथील बेस कॅम्पवरून चढाई सुरू करणाऱ्या तीन मित्रांपैकी दोघांचा हिमस्खलनात मृत्यू झाला. या तिघांनी १३ हजार फूट उंचीवर एक सेल्फी काढला होता. १ ऑक्टोबर दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी काढलेला हा फोटो दोघांसाठी अखेरचा ठरला.

१ ऑक्टोबरला तिघांनी १३ हजार फूट उंचीवर सेल्फी काढला. तो सोशल मीडियावर अपलोड करायचं तिघांनी ठरवलं होतं. मात्र विनय आणि कपिल या जगात नाहीत. त्या सेल्फीमागची गोष्ट तिघे संपूर्ण जगाला सांगणार होते. मात्र तसं काही घडलं नाही. ४ ऑक्टोबरला हिमस्खलन झालं. तिघांच्या टीममध्ये एकूण ४१ गिर्यारोहक होते. त्यात विनय आणि कपिलसह २५ जणांचा मृत्यू झाला. टीममधील २ गिर्यारोहक अद्यापही बेपत्ता असून १२ जणांची यशस्वी सुटका झाली आहे.
उत्तरकाशीपासून १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या तेहरीमध्ये रोहित वास्तव्यास आहे. गेल्या ५ दिवसांपासून त्याला झोप लागलेली नाही. अनेक आठवणी निर्माण करण्यासाठी, मनसोक्त जगण्यासाठी रोहित गिर्यारोहणाला गेला. मात्र सोबत अनेक कटू आठवणी घेऊन तो परतला. ‘मला माझ्या मित्रांचे चेहरे आजही दिसताहेत. अवघ्या ५ मिनिटांत सगळंच संपलं. मी कधी शांतपणे झोपू शकेन असं वाटत नााही,’ अशा शब्दांत रोहितनं त्याची मनस्थिती सांगितली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.