shivsena dada bhuse, नाशिकच्या नव्या पालकमंत्र्यांचा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना दणका – shivsena leader and guardian minister dada bhuse decision in the district planning committee meeting set back for ncp chhagan bhujbal
नाशिक : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारमधील नवनियुक्त पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिकसाठी १ हजार ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली असून यातील २४५ कोटी रुपये प्राप्त झाले असल्याचं सांगितलं आहे.
नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान जिल्हाभरातील सर्वपक्षीय आमदार नाशिकच्या नियोजन भवन येथे उपस्थित होते. यावेळी अनेक विकास कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीत आणखी एक निर्णय घेत पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना जोरदार दणका दिला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात दादा भुसेंनी बदल केला आहे. एकनाथ खडसे थेट बोलले; शिवसेना पक्षाचे दोन तुकडे होण्यामागे घेतले या व्यक्तीचे नाव
तत्कालीन सरकार अल्पमतात असताना मंजूर करण्यात आलेल्या निधीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीला स्थगिती दिली होती. जिल्हाधिकाऱ्यांना देखील निधी रोखण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र ,आता त्या निधीत बदल करून ही स्थगिती उठवली जाणार असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी सांगितलं आहे. आधीच्या निधी वाटपात असमतोल असल्याचं म्हणत काही तालुक्यात कमी खर्च तर काही तालुक्यात जास्त खर्च झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच जिल्हा नियोजन समितीच्या विकास कामातील निधीचं सुयोग्य वाटप करण्याचा प्रयत्न करू असे देखील पालकमंत्री भुसे म्हणाले आहेत.
दरम्यान, आतापर्यंत प्राप्त निधीतून ८७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. नुकसानग्रस्त भागासाठी ११ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत, अशी माहिती देखील माध्यमांशी बोलताना दादा भुसे यांनी दिली आहे.