निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिली आहे. ठाकरे गटानं निवडणूक आयोगाकडे पक्षासाठी सुचवलेल्या नावात ठाकरे कुटुंबातील तीन पिढ्यांचे प्रतिबिंब दिसून येत होतं. ठाकरे गटाकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही नावं सुचवण्यात आली होती.
ठाकरे आणि शिंदे गटाने शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावावर दावा केला. त्यामुळे निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना हे नाव दिलं नाही. ठाकरे गटानं शिवसेना बाळासाहेब ठाकरे असा नावावर दावा केल्यानं शिंदे गटानं या नावावर दावा सांगितला. निवडणूक आयोगानं दावा फेटाळावा आणि ठाकरे गटाला ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळू नये यासाठी शिंदे गट मोठ्या हुशारीनं ही चाल खेळला.
दुसरीकडे शिंदे गटानं पहिल्या पसंतीसाठी आयोगाला शिवसेना बाळासाहेब ठाकरे नाव सुचवलं. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीसाठी बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना हे पर्याय दिले. यातला पहिला पर्याय ठाकरे गटाला काऊंटर करण्यासाठी देण्यात आला होता. दोन्ही गटांनी सारखाच दावा केल्यानं शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नाव निवडणूक आयोगानं कोणालाच दिलं नाही. शिंदे गटानं दुसरा पर्याय म्हणून बाळासाहेबांची शिवसेना नाव सुचवलं. ते त्यांना मिळालं आहे.