नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवून शिवसेना हे नाव वापरण्यास बंदी घातल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने आयोगाला तीन पर्याय दिले होते. त्यावर आता निवडणूक आयोगाने आपला निर्णय देत उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘मशाल’ हे पक्षचिन्ह तर पक्षासाठी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नावाला मंजुरी दिली आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नावाची परवानगी दिली आहे. तसंच शिंदे गटाने पक्षचिन्हासाठी सुचवलेले तिन्ही पर्याय बाद ठरवत चिन्हासाठी पुन्हा तीन पर्याय सुचवण्याचे आदेश दिले आहेत.

खरंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षासाठी ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘मशाल’ या निवडणूक चिन्हांचा पर्याय दिला होता. तर नव्या पक्षनावासाठी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ ही नावे नोंदणीसाठी दिली होती. मात्र निवडणूक आयोगाने पहिले दोन पर्याय बाद ठरवत शिवसेनेला पक्षाच्या चिन्हासाठी तिसऱ्या पर्यायावरच शिक्कामोर्तब केलं आहे.

‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव शिंदे गटाला तर ठाकरेंना मशाल चिन्ह, निवडणूक आयोगाचा निर्णय काय?

पहिली दोन चिन्ह आणि एक नाव का बाद ठरवले?

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या संघर्षानंतर शिवसेनेच्या चिन्हाच्या आणि पक्षनावाच्या वादावर निकाल देताना निवडणूक आयोगाने ठाकरे गटाने पहिल्या दोन प्रधान्यक्रमाने सुचवलेली चिन्हं बाद ठरवली. हा निर्णय घेताना आयोगाने त्यामागील कारणांबाबतही माहिती दिली आहे. शिवसेनेने सुचवलेलं त्रिशूळ या पहिल्या चिन्हाला धार्मिक अर्थ असल्याने ते नाकारण्यात आलं. तर ठाकरे गटाने दुसऱ्या क्रमांकावर सुचवलेलं उगवता सूर्य हे तामिळनाडूतील डीएमके या राजकीय पक्षाचं चिन्ह असल्याने ते ठाकरे गटाला देण्यास आयोगाने नकार दिला आहे.

धनुष्यबाण गोठलं, पण अगोदर शिवसेनेकडे कोणती चिन्हं होती? भुजबळ ‘मशाली’वर निवडून आलेले!

नावांबाबत काय झाले?

उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नावासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नाव प्रथम प्राधान्याने सुचवलं होतं. मात्र शिंदे गटाचंही पहिलं प्राधान्य तेच असल्याने अखेर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या दुसऱ्या प्राधान्याने असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाला मंजुरी दिली आहे.

दरम्यान, शिंदे गटाने सुचवलेली त्रिशूळ आणि गदा ही दोन चिन्ह धार्मिक अर्थाची असल्याने नाकारण्यात आली, तर उगवता सूर्य हे चिन्ह आधीच डीएमके या पक्षाकडे असल्याने तेही बाद करण्यात आले. त्यामुळे शिंदे गटाला आता पुन्हा एकदा तीन नवे पर्याय पक्षचिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे सुचवावे लागणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here