एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत बाळासाहेब खुर्चीत बसलेले दिसून येत आहेत. तर एकनाथ शिंदे त्यांच्या जवळ बसलेले आहेत. दोघांमध्ये काहीतरी संभाषण सुरु आहे. असा फोटो ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी जिंकल्याची भावना व्यक्त केलीये. प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय झाला, असं ट्विट करत आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणत उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.
राज्यातील सत्तासंघर्षात उद्धव ठाकरे यांच्यासमोर शड्डू ठोकून उभ्या राहिलेल्या शिंदे गटाकडून ठाकरे यांच्यावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाही. उद्धव ठाकरे यांची शक्य त्याठिकाणी कोंडी करण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरु होते. शिंदे गटाच्या याचिकेनंतर नुकतेच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले होते. यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे पर्यायी पक्षचिन्हांची यादी सादर करण्यात आली होती. यामध्ये त्रिशूळ, धगधगती मशाल आणि उगवता सूर्य या तीन चिन्हांचा समावेश होता. शिवसेनेकडून रविवारी पर्याय चिन्हांची ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सादर करण्यात आली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी शिंदे गटानेही यापैकी दोन चिन्हांवर दावा सांगितला. शिंदे गटाकडून सोमवारी आयोगापुढे सादर करण्यात आलेल्या पक्षचिन्हांच्या यादीत गदा, त्रिशूळ आणि धगधगत्या मशालीचा समावेश आहे. त्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाच्या एकंदरित कार्यपद्धतीनुसार एकाच गोष्टीवर दोन पक्षांचा दावा असल्यास संबंधित गोष्ट कोणालाच न देता बाद ठरवली जाते. त्यामुळे त्रिशूळ चिन्ह बाद झालं. तर उगवता सूर्य हे डीएमकेचं चिन्ह असल्याने ठाकरेंना ते चिन्ह निवडणूक आयोगाने नाकारलं.
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे ‘शिवसेना’ हे नाव व ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून तीन नवे पर्याय देण्यात आले होते. ठाकरे गटाने आपल्या पक्षासाठी ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘मशाल’ या निवडणूक चिन्हांचा पर्याय दिला होता. तर नव्या पक्ष नावासाठी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ व ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ ही नावे नोंदणीसाठी दिली होती. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्षनावाबाबत पर्याय दिला होता.