उस्मानाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन नेत्यांमध्ये शिवसेनेतील वर्चस्वाबाबत सुरू असलेल्या लढाईत आज निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे पक्षचिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह पक्षनाव दिलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मंजूर करण्यात आलं आहे. तसंच शिंदे गटाने सुचवलेली तिन्ही पक्षचिन्हं बाद करत नव्याने तीन पर्याय सुचवण्याचे आदेश दिले आहेत.

निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या पक्षाच्या नावाबाबत आणि चिन्हाबाबत ठाकरे गटाकडून समाधान व्यक्त करण्यात आलं असून आगामी काळात या नाव आणि चिन्हाच्या आधारे आम्ही राजकीय विरोधकांना आस्मान दाखवू, असा दावा ठाकरे गटाचे नेते करत आहेत. खरंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाने पक्षचिन्हासाठी ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘मशाल’ या चिन्हांचा पर्याय दिला होता. त्यामुळे आयोगाकडून नेमकं कोणतं चिन्ह दिलं जातं, याबाबत उत्सुकता होती. मात्र त्रिशूळ या पहिल्या चिन्हाला धार्मिक अर्थ असल्याने ते नाकारण्यात आलं. तर ठाकरे गटाने दुसऱ्या क्रमांकावर सुचवलेलं उगवता सूर्य हे तामिळनाडूतील डीएमके या राजकीय पक्षाचं चिन्ह असल्याने ते ठाकरे गटाला देण्यास आयोगाने नकार दिला आणि मशाल हे चिन्ह मंजूर केलं.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांचं बोलकं ट्विट, उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं

निष्ठावंतांना चाहूल लागल्याची का होऊ लागली चर्चा?

उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकर आणि कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील हे पक्षातील बंडखोरीनंतरही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. याच ओम राजेनिंबाळकर आणि कैलास पाटील यांचा २४ तासांपूर्वीचा एक फोटो व्हायरल होत आहे. कारण उस्मानाबादमधील भवानी चौक येथे स्थानिक आमदार कैलास पाटील यांच्या निधीतून भव्य अशी मशाल उभारण्यात आली आहे आणि रविवारी सायंकाळीच या मशालीचे लोकार्पण खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष नंदू भय्या राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.

दरम्यान, खासदार निंबाळकर आणि आमदार कैलास यांच्या या कार्यक्रमाला काही तास उलटताच आज निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हेच पक्षचिन्ह दिलं असल्याने या दोन्ही लोकप्रतिनिधींना पक्षचिन्हाची चाहूल आधीच लागली होती का, अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here